Monday , January 30 2023
Breaking News

दुसर्‍या दिवसअखेर इंग्लंडकडे 345 धावांची आघाडी

लंडन : वृत्तसंस्था
भारत-इंग्लंड यांच्यातील तिसर्‍या कसोटी क्रिकेट सामन्यातील दुसर्‍या दिवशी भारतीय गोलंदाजांनी घोर निराशा केली, तर लीड्सवरील चाहत्यांना जो रूटच्या (121 धावा) शतकी खेळीने मंत्रमुग्ध केले. रूटने मालिकेतील तिसरे शतक साकारले, तर अखेरच्या सत्रात भारतीय गोलंदाजांनी पाच बळी मिळवत दिलासा दिला.
रूटच्या शतकाव्यतिरिक्त डेव्हिड मलान (70), हसीब हमीद (68) आणि रॉरी बन्र्स (61) यांनी अर्धशतके झळकावल्यामुळे इंग्लंडने दुसर्‍या दिवसअखेर 8 बाद 423 धावांपर्यंत मजल मारली आहे. पहिल्या डावात इंग्लंडने 345 धावांची मोठी आघाडी घेऊन सामन्यावरील पकड मजबूत केली आहे. दिवसअखेर क्रेग ओव्हर्टन 24 आणि ऑली रॉबिन्सन शून्यावर खेळत आहे. इंग्लंडने पहिल्या सत्रात 61, तर दुसर्‍या सत्रात 116 धावांची लूट केली, परंतु अखेरच्या सत्रात भारताने 125 धावांच्या मोबदल्यात पाच बळी मिळवून इंग्लंडच्या धावगतीला काहीसा लगाम लावला.
बुधवारच्या बिनबाद 120 धावांवरून पुढे खेळताना इंग्लंडने दमदार सुरुवात केली. अखेर मोहम्मद शमीने बन्र्सचा त्रिफळा उडवून इंग्लंडला 135 धावांवर पहिला झटका दिला. काही षटकांच्या अंतरातच रवींद्र जडेजाने हमीदचा त्रिफळाचीत केले, परंतु यानंतर रूट आणि मलान यांनी तिसर्‍या गड्यासाठी 139 धावांची भर घालून इंग्लंडची आघाडी दोनशेपलीकडे नेली. दुसर्‍या सत्रात भारताला एकही बळी मिळणार नाही असे वाटत असतानाच चहापानापूर्वीच्या अखेरच्या चेंडूवर मोहम्मद सिराजने मलानचा अडथळा दूर केला. त्यानंतर जॉनी बेअरस्टो (29) आणि जोस बटलर (7) यांना शमीने फार काळ टिकून दिले नाही. रूटने मात्र भारतीय गोलंदाजांचा खरपूस समाचार घेत चौकाराच्या साहाय्याने शतक गाठले.
जसप्रीत बुमराने रूटला बाद केले. रूटने चार तास किल्ला लढवताना 14 चौकारांसह 121 धावा केल्या. रूट माघारी परतल्यावर इंग्लंडची फलंदाजी काहीशी ढेपाळली. जडेजा आणि सिराजने अनुक्रमे मोईन अली (8) आणि सॅम करनला (15) बाद केले.

Check Also

माथेरानकर अनुभवणार सुलभ, स्वस्त प्रवास

ई-रिक्षाच्या सुविधेमुळे पर्यटकांसह नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण माथेरान : रामप्रहर वृत्त दहा वर्षांपूर्वी नगरपरिषदेच्या तत्कालीन लोकप्रतिनिधीनी …

Leave a Reply