कर्जत : बातमीदार
कर्जत विधानसभा मतदारसंघातील 343 मतदान केंद्रात 943 अंध-दिव्यांग मतदार असून, त्यांना मतदानकेंद्रापर्यंत पोहचविण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना आणि स्काऊट-गाईडच्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करण्यात आले होते. सोमवारी (दि.29)दिव्यांग आणि अंध मतदारांना हे विद्यार्थी मतदानकेेंद्रावर मदत करीत होते.
सर्व मतदारांना मतदानाचा अधिकार बजावता यावा, यासाठी मावळ लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणात नियोजन करण्यात आले होते. त्यानुसार तालुक्यातील अभिनव प्रशाला-कर्जत, जनता विद्यालय-दहिवली, नेरळ विद्या मंदिर आणि खालापूर तालुक्यातील छत्रपती विद्यालय-वावोशी या चार शाळांमधील आणि कनिष्ठ महाविद्यालय मधील 130 विद्यार्थ्यांना कर्जत विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी वैशाली परदेशी, तहसीलदार अविनाश कोष्टी, इरेश चपळवार, नायब तहसीलदार विजय पुजारी यांच्या कक्षात प्रशिक्षण देण्यात आले होते. त्यांना निवडणूक विभागाने सोमवारी मतदान काळात मतदान केंद्राबाहेर उभे राहण्याचे आणि मतदारांना मदत करण्याचे काम दिले होते. हे सर्व विद्यार्थी आपले राष्ट्रीय सेवा योजना प्राध्यापक गणेश काळण, जगताप, निकम यांच्यासह मतदान केंद्राबाहेर मतदारांना मदत करीत होते. या विद्यार्थ्यांमुळे कर्जत विधानसभा मतदार संघातील अंध आणि दिव्यांग मतदारांना मतदान प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी मदत झाली.
– राष्ट्रीय सेवा योजना आणि स्काऊट गाईडच्या विद्यार्थ्यांना आम्ही केवळ एक दिवस ट्रेनिंग दिले, मात्र त्या सर्व विद्यार्थ्यांनी मतदान केंद्राबाहेर त्याला दिलेल्या प्रशिक्षणाप्रमाणे मतदान प्रक्रियेत निःपक्षपातीपणे काम केले, त्याबद्दल त्यांचे कौतुक.
-विजय पुजारी, नायब तहसीलदार, कर्जत