उरणमध्ये खासगी, शासकीय रुग्णालयात रुग्णांची गर्दी
उरण : प्रतिनिधी
सध्या पावसाने दरी मारल्याने ढगाळ व उन्ह यांचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे सातत्याने हवेत होणारा बदल यामुळे उरण तालुक्यातील शहरी तसेच ग्रामीण भागातील रहिवाशांना सध्या सर्दी, खोकला, घसा दुखी, अंगदुखी, काविळ या सारख्या आजाराबरोबर ताप, मलेरिया या आजारांनी ग्रासले आहे. त्यामुळे सदर आजारांवर उपचार करून घेण्यासाठी रुग्ण रुग्णालयांमध्ये ये-जा करत असल्याचे चित्र खासगी व शासकीय रुग्णालयात पहावयास मिळत आहे.
चिरनेर येथील डॉ. प्रकाश मेहता यांनी माहिती देताना सांगितले की, सध्या हवामानातील बदलामुळे आणि वाढत्या उष्णतेमुळे तसेच दुषित पाण्यामुळे रहिवाशांना सर्दी, खोकला, घसा दुखी, अंगदुखी, ताप यासारख्या आजारांचा सामना करावा लागत आहे.तरी रहिवाशांनी घाबरून न जाता आपले परिसर स्वच्छ ठेवून घरातील पाणी उकळून घ्यावे, तेलकट पदार्थ खाणे टाळावे तसेच घाबरून न जाता आप आपल्या परिसरातील डॉक्टरांच्या सल्ल्याने या आजारांवर उपचार करून घ्यावेत.