Breaking News

विकासाचे नवे पर्व

शिंदे-फडणवीस या जोडीने पहिल्याच बैठकीत जलयुक्त शिवार योजनेचे पुनरुज्जीवन करण्याचा इरादा जाहीर केला आणि सोबत मुंबईतील मेट्रो रेल्वेची कारशेड आरे येथील भूखंडावरच उभारण्याच्या दृष्टीने सूचना केल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन हा ठाकरे सरकारने अडचणीत आणलेला प्रकल्पही आता वेगाने पुढे रेटला जाईल यात शंका नाही. पायाभूत सोयींचे हे सारे प्रकल्प निष्कारण वादाच्या भोवर्‍यात सापडले होते. महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजभवनात पदाची शपथ घेतल्यानंतर महाराष्ट्रात विकासाचे नवे पर्व सुरू झाले असे म्हणता येईल. गेली अडीच वर्षे महाराष्ट्राचा गाडा राजकारणाच्या चिखलात ठप्प होऊन पडला होता. शपथविधीनंतर मंत्रिमंडळाची पहिलीवहिली बैठकही मंत्रालयात पार पडली. आपले सरकार गतिमान कारभार करू इच्छिते असे मुख्यमंत्री शिंदे यांनी बैठकीनंतर सांगितले. त्याची चुणूक पहिल्याच बैठकीत मिळाली आहे. या बैठकीत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे दोघेच उपस्थित होते कारण अन्य मंत्र्यांचा शपथविधी अजुन बाकी आहे. गेल्या सरकारमध्ये अग्रणी राहून नेतृत्व करणार्‍या फडणवीस यांची जलयुक्त शिवार ही महत्वाकांक्षी योजना होती. या योजनेमुळे लक्षावधी शेतकर्‍यांना लाभ झाला. दुष्काळाची तीव्रता लक्षणीयरित्या कमी झाली. परंतु सत्तेचे पारडे फिरवून डोक्यावर आलेल्या महाविकास आघाडी सरकारने विनाकारण खुस्पटे काढत ही योजना बासनात गुंडाळली. जलयुक्त शिवार योजनेमध्ये भ्रष्टाचार झाल्याची ओरड करत या योजनेला ब्रेक लावण्यात आला. चौकशीअंती काहीही हाती लागू शकले नाही. कारण तसे ते लागणारच नव्हते. फडणवीस यांनी पाच वर्षे महाराष्ट्राचा कारभार अतिशय पारदर्शकपणे आणि कार्यक्षमतेने चालवला होता. किंबहुना, आपल्या राज्याला आजवर जे मुख्यमंत्री लाभले, त्यातील सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्र्यांपैकी एक असे त्यांचे वर्णन केले गेले होते. आरे येथील मेट्रो कारशेडचा निर्णय फडणवीस यांनी अतिशय अभ्यासपूर्ण पद्धतीने मार्ग काढत घेतलेला निर्णय होता. परंतु अहंकाराची बाधा झालेल्या ठाकरे सरकारने या निर्णयास देखील पाचर मारली. फडणवीस यांची कार्यक्षमता महाराष्ट्राच्या ओळखीची असल्यामुळेच त्यांना यावेळी ‘उपमुख्यमंत्री’ पदाची शपथ घेताना पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. गेल्या दहा दिवसांत ज्या घडामोडी घडत होत्या, त्या पाहता फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री होतील अशी खूणगाठ सर्वांनीच मनात बांधली होती. परंतु सर्वोच्च स्थानी एका बंडखोर शिवसैनिकाला बसवून फडणवीस यांनी मनाचा उमदेपणा दाखवला. महाराष्ट्रावरील त्यांचे प्रेम, निष्ठा आणि नि:स्वार्थ बुद्धी याचेच हे द्योतक आहे. राजकारणात अशी उदाहरणे दुर्मीळ असतात. पक्षादेश हा सर्वोपरि आहे याचे भान ठेवत त्यांनी शांतपणे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. भारतीय जनता पक्षाकडे असे एकनिष्ठ आणि नि:स्वार्थी कार्यकर्ते आहेत हेच काही राजकीय पक्षांच्या नेत्यांना आवडत नाही. नव्या मंत्रिमंडळात फडणवीस यांनी काहिसे दुय्यम स्थान स्वीकारले असले तरी त्याला पदावनती म्हणता येणार नाही. मुख्यमंत्री पदी विराजमान झाल्यानंतर पुढील काळात साधे मंत्रिपद स्वीकारणारे अनेक नेते महाराष्ट्रात होऊन गेले. स्व. शंकरराव चव्हाणांपासून भाजपचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यापर्यंत अनेक उदाहरणे देता येतील. नव्या सरकारसोबत महाराष्ट्रात नवे पर्व सुरू झाले आहे एवढे मात्र खरे!

Check Also

शिधापत्रिकाधारकांच्या प्रश्नावर आमदार प्रशांत ठाकूर यांनी अधिवेशनात शासनाचे लक्ष केले केंद्रित

पनवेल, मुंबई : रामप्रहर वृत्तराज्यातील शिधापत्रिकाधारकांच्या अडचणींवर आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शासनाचे …

Leave a Reply