Breaking News

पोशीर येथील साठवण विहिरीत शेवाळ आणि जलपर्णी

पाणीपुरवठा कमिटीचे दुर्लक्ष; वर्षभरात विहिरींची साफसफाईच नाही

कर्जत : बातमीदार

बिरदोले गावाजवळ उल्हास नदीलगत असलेल्या पोशीर पाणीपुरवठा योजनेच्या साठवण टाकीची दुरवस्था झाली असून टाकीतील पाण्यावर शेवाळ, जलपर्णीचे थर साचले आहेत. वर्षभरात एकदाही या साठवण टाकीची साफसफाई केली नसल्याने पाण्यावर जलपर्णी साचली आहे.

पोशीर ग्रामपंचायतीची 1967 पासून अस्तित्वात असलेली जुनी पाणीपुरवठा योजना अखेरच्या घटका मोजत असल्याने, मोठ्या लोकसंख्येच्या पोशीर व त्यासोबत चिकणपाडा या गावांना पाणीपुरवठा करणे मुश्कील बनले होते. त्यामुळे राष्ट्रीय पेयजल योजनेतून एक कोटी पंचवीस लाख रुपये इतक्या निधीची नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली. ती पूर्ण झाल्यानंतर योजनेतील जलवाहिनीस गळती लागल्याचे यापूर्वी अनेकदा घडले आहे. या नवीन पाणी योजनेला अजून दोन वर्षेही पूर्ण झाली नाहीत आणि तिची अशी दुरवस्था झाली आहे. त्यामुळे या योजनेचे भवितव्य काय असा प्रश्न उभा ठाकला आहे.

 या पाणी पुरवठा योजनेच्या बिरदोले येथील साठवण टाकीत शेवाळ आणि जलपर्णी वाढल्याने पृष्ठभागावरील पाणी पूर्ण झाकून गेले आहे. साठवण टाकीच्या या आवस्थेकडे लक्ष देण्यास ग्रामपंचायतीला वेळ नाही. 2017पासून आजतागायत दीड वर्षे पूर्ण होऊनदेखील ही योजना पोशीर ग्रामपंचायतीने अद्याप ताब्यात घेतली नाही. त्यामुळे तिच्या देखभाल दुरुस्तीचा खर्च पोशीर गाव पाणीपुरवठा समितीकडून केला जातो. मागील काही ग्रामसभांमध्ये हा मुद्दा वारंवार चर्चेस आला आहे. मात्र ही योजना ग्रामपंचायत का स्वीकारत नाही, याबद्दल अद्याप प्रश्नचिन्ह कायम आहे. त्यामुळे या योजनेचे विज बिल पाणीपुरवठा समितीला पाणीपट्टी वसूल करून भरावे लागत आहे. त्यातूनच कर्मचार्‍यांचा पगारदेखील द्यावा लागत आहे. अनेकांनी पाणीपट्टी थकविली आहे. तूर्तास या साठवण टाकीतील शेवाल व जलपर्णी काढून टाकणे आवश्यक आहे. या पाणीपुरवठा योजनेच्या मुख्य जलवाहिनीस अनेक ठिकाणी जोडणी दिल्याने गळती होत असल्याची शक्यता नाकारता येत नाही. पोशीर पाणीपुरवठा योजनेच्या या समस्यांकडे लक्ष देण्यास ग्रामपंचायतीस वेळ नसल्याने पाणी कमिटीने ही दुर्लक्ष केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे साठवण टाकीत साठलेली जलपर्णी आणि शेवाळ काढली नाही, तर पोशीर ग्रामस्थांना काही दिवसात दूषित पाण्याचा सामना करावा लागेल यात शंका नाही.

पोशीरमधील पाणीपुरवठा योजना पूर्ण झाल्यानंतर अनेक ठिकाणी गळती लागली होती. त्यामुळे वर्षभर ही योजना पाणी कमिटीच्या ताब्यात दिली आहे. ती कशाप्रकारे चालते, हे पाहण्यासाठी ताब्यात घेतली नव्हती. या योजनेचा पूर्ण हिशोब पाणी कमिटीने ग्रामपंचायतीच्या ताब्यात दिल्यानंतर ही योजना ताब्यात घेण्यासंदर्भात आम्ही नियोजन करणार आहोत.

-हरिचंद्र निरगुडा,सरपंच, पोशीर ग्रामपंचायत

पोशीर आणि चिकनपाडामधील अनेक नळधारकांची पाणीपट्टी थकली आहे, त्यामुळे अडचण निर्माण होत आहे. तरी  पाणीपुरवठा साठवण विहिरीची पाहणी करून लवकरच टाकीची (विहिरीची) साफसफाई केली जाईल.

-मालू शिंगटे, अध्यक्ष, पोशीर पाणीपुरवठा कमिटी

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply