Monday , February 6 2023

बंगळुरूचा राजस्थानवर रॉयल विजय

दुबई : वृत्तसंस्था

गोलंदाजांनी रचलेल्या पायावर ग्लेन मॅक्सवेलसह (30 चेंडूंत सहा चौकार आणि एका षटकारासह नाबाद 50 धावा) फलंदाजांनी कळस चढवल्यामुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने बुधवारी इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटमध्ये राजस्थान रॉयल्सवर 7 गडी आणि 17 चेंडू राखून विजय मिळवला.

आयपीएल 2021 चा 43वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला. यात बंगळुरूने राजस्थानवर 7 गड्यांनी मात करत प्लेऑफच्या दृष्टीने मजबूत पाऊल टाकले. बंगळुरूचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून राजस्थानला प्रथम फलंदाजीचे निमंत्रण दिले. एविन लुईस आणि यशस्वी जयस्वाल यांनी राजस्थानला उत्तम सुरुवात मिळवून दिली. पण हे दोघे माघारी परतल्यानंतर राजस्थानला शेवटच्या 12 षटकात 72 धावा करता आल्या. चांगल्या सुरुवातीनंतरही राजस्थानचा शेवट कडू ठरला आणि त्यांनी बंगळुरुला 150 धावांचे आव्हान दिले. विराटसेनेकडून शाहबाझ अहमदने राजस्थानच्या मधल्या फळीला धक्का देत दोन गडी टिपले, तर पर्पल कॅप सांभाळणार्‍या हर्षद पटेलने शेवटच्या षटकात तीन बळी घेतले. 

राजस्थानच्या 150 धावसंख्येच्या लक्ष्याचा पाठलाग करताना विराट कोहली (25) आणि देवदत्त पडिक्कल (22) यांनी 5.2 षटकांत 48 धावांची वेगवान सलामी दिली. कोहली धावचीत झाला, तर पडिक्कलचा मुस्ताफिझूर रेहमानने त्रिफळा उडवला. त्यानंतर के. एस. भरत आणि मॅक्सवेल यांनी तिसर्‍या गड्यासाठी 69 धावांची भागीदारी करीत विजय आवाक्यात आणला, पण 44 धावा करणार्‍या भरताचा अडसरही रेहमानने दूर केला. मग मॅक्सवेलने फटकेबाजी करीत बेंगळुरूच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

त्याआधी, बंगळुरूच्या गोलंदाजांनी राजस्थानला 9 बाद 149 धावसंख्येवर रोखण्यात यश मिळवले. डावखुरा फिरकी गोलंदाज शाहबाझ अहमद (2/10) आणि लेग-ब्रेक गोलंदाज

यजुर्वेद्र चहल (2/8) आणि वेगवान गोलंदाज हर्षल पटेल (3/34) यांनी राजस्थानच्या फलंदाजांवर अंकुश ठेवला. सामन्यात 2 बळी घेणार्‍या बंगळुरूच्या यजुर्वेंद्र चहलला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. या विजयासह बंगळुरूच्या खात्यात 14 गुण झाले असून ते गुणतालिकेत तिसर्‍या स्थानी आहेत.

राजस्थान रॉयल्स : 20 षटकांत 9 बाद 149 (एव्हिन लेविस 58, यशस्वी जैस्वाल 31; हर्षल पटेल 3/34) पराभूत वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : 17.1 षटकांत 3 बाद 153 (ग्लेन मॅक्सवेल नाबाद 50, के. एस. भरत 44; मुस्ताफिझूर रेहमान 2/20)

Check Also

कर्जतमधील रायगड जिल्हा बँकेची शाखा जळून खाक

कर्जत : प्रतिनिधी रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेला रविवारी (दि. 5) पहाटेच्या सुमारास आग …

Leave a Reply