Breaking News

पाचाड प्राथमिक आरोग्य केंद्रात सलाईनचा तुटवडा

महाड : प्रतिनिधी

रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड गावातील रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात गेल्या काही दिवसांपासून काही औषधे आणि सलाईनचा तुटवडा भासत आहे. यामुळे परिसरातील रुग्णांना पैसे खर्च करून खाजगी दवाखान्यात जावे लागत आहे. जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या औषधपुरवठा विभागाकडून अल्प प्रमाणात सलाईनपुरवठा होत असल्याचे समोर आले आहे. रुग्णसंख्या वाढली असतानाही पाचाड प्राथमिक आरोग्य केंद्राला महिनाभराकरिता केवळ 50 सलाईनचा पुरवठा केला जात असल्याची माहिती देण्यात आली आहे. महाड तालुक्यातील पाचाड येथे गेल्या अनेक वर्षांपासून रायगड जिल्हा परिषदेचे प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यरत आहे. पाचाड, रायगडवाडी, नेवाळी, हिरकणीवाडी, पुनाडे, सांडोशी, सावरट, कोंझर, कोथुर्डे, वाळसुरे, छत्री निजामपूर आदी गावातील रुग्णांना या ठिकाणी आरोग्य सुविधेचा लाभ घेता येतो. किल्ले रायगडावर येणार्‍या शिवप्रेमींनादेखील या प्राथमिक आरोग्य केंद्राचा फायदा होत आहे. या परिसरात खाजगी दवाखाने नसल्याने गरोदर महिलांनादेखील प्रसूतीसाठी या प्राथमिक आरोग्य केंद्राचा आधार होतो. मात्र गेल्या काही वर्षांपासून या ठिकाणी अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे स्थानिक रुग्णांना पदरमोड करून उपचारासाठी महाड शहरात जावे लागत असल्याची माहिती ग्रामस्थ अमर सावंत यांनी दिली. पाचाड प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी उपलब्ध असले तरी औषध साठा पुरेसा नसल्याने रुग्णांना महाड शहरातील अन्य दवाखान्यात जावे लागत आहे. गेले काही दिवस या केंद्रात सलाईनचा तुटवडा भासत आहे. पाचाड प्राथमिक आरोग्य केंद्राकडून महाड पं.स.चे तालुका आरोग्य अधिकारी तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे 3 ऑगस्टच्या लेखी पत्रान्वये वाढीव औषधांची मागणी करण्यात आली आहे. मात्र याला अद्याप प्रतिसाद न मिळाल्याने रुग्णांचे मात्र हाल होत आहेत.  पाचाड प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत नाते, अचाळोली, कोंझर आणि निजामपूर अशी चार उपकेंद्र आहेत. जवळपासचे सुमारे 14 हून अधिक गावांमधील रुग्ण या उपकेंद्रात उपचारासाठी येतात. पावसाळ्यात अतिसार, कॉलरा, कावीळ, विविध प्रकारचे ताप आदी साथीचे रुग्ण तर किल्ले रायगडावर येणारे पर्यटकदेखील तेथे दाखल होतात. सद्य स्थितीत या प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रतिदिन 80 हून अधिक रुग्ण येत आहेत. रुग्णांना सलाईन देणे गरजेचे असते. मात्र जिल्हा औषधपुरवठा विभागाकडून अल्प प्रमाणात सलाईनपुरवठा होत असल्यामुळे पाचाड प्राथमिक आरोग्य केंद्रातील सलाईन अल्पावधीतच समाप्त होत आहेत. हा विषय स्थानिक नागरिकांनीदेखील सोशल मीडियावर ताणून धरला असून रुग्णांना सुविधा मिळावी, अशी त्यांची मागणी आहे.

 

राजिप आरोग्य विभागाकडून संपूर्ण जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात औषध पुरवठा होतो. पाचाड प्राथमिक आरोग्य केद्राला दरमहा 50 सलाईन दिल्या जातात. रुग्णसंख्या वाढल्यास संबंधित रुग्णालयाने रुग्ण कल्याण समितीमधून खरेदी करणे आवश्यक आहे.

-श्री. चौधरी, रायगड जिल्हा आरोग्य विभाग, अलिबाग

 

पाचाड प्राथमिक आरोग्य केंद्रात सलाईन, कांही औषधे उपलब्ध नसल्याने ऐन पावसाळ्यात उद्भवणार्‍या स्थितीला सामोरे जाताना नागरिकांना आणि वैद्यकीय अधिकार्‍यांना कसरत करावी लागत आहे. औषध तुटवड्यामुळे रुग्णांना आर्थिक भुर्दंड देखील बसत आहे. यामुळे औषध पुरवठा वेळेवर होणे गरजेचे आहे.

 -लहू औकीरकर, ग्रामस्थ, पाचाड, ता. महाड

 

गेले काही दिवस रुग्णसंख्या वाढली आहे. यामुळे उपलब्ध औषधसाठा अपुरा पडत आहे. राजिप आरोग्य विभागाकडे औषध पुरवठा करण्याची मागणी केली आहे.

– डॉ. सृष्टी शेळके, वैद्यकीय अधिकारी,  पाचाड प्राथमिक आरोग्य केंद्र

Check Also

पनवेल महापालिकेच्या विविध विकासकामांचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते भूमिपूजन

पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका महाराष्ट्र राज्य, देश अशा सर्व स्तरावर पुढे जाण्यासाठी आगेकूच …

Leave a Reply