Breaking News

नवरात्रोत्सव विशेष  : नागोठण्याची श्री जोगेश्वरी माता

नागोठणे : राज वैश्यंपायन
नागोठण्याची श्री जोगेश्वरी माता, भैरवनाथ महाराज व व्याघ्रेश्वर या ग्रामदैवतांची घटस्थापना झाल्यानंतर नवरात्रोत्सवास प्रारंभ झाला आहे. नागोठणे विभागासह रायगड जिल्ह्यातील भाविक, भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या जोगेश्वरी मातेचे दर्शन घेण्यासाठी या मंदिरात भक्तगणांची मांदियाळी पाहायला मिळत आहे.
नागोठण्याचे ग्रामदैवत जोगेश्वरी मातेचे मंदिर शहराच्या मध्यभागी असून मंदिर परिसरात तीन तलाव आहेत. या तलावांची बांधणी शिवकालीन असून चारही बाजूंनी भिंत व आतील बाजूने दगडाची चिरेबंदी आहे. 1819 साली जोगेश्वरी मातेच्या मंदिराची स्थापना झाली. या स्थापनेची एक अख्यायिका आहे. नागोठणे पंचक्रोशीतील मुरावाडी या गावात ताडकर आडनावाचे एक गृहस्थ होते. त्यांच्या स्वप्नात एकदा देवीने दर्शन दिले. मी नागोठण्याच्या पूर्व दिशेला सागवानी डोंगरात आहे. तिथून मला डोक्यावर घेऊन खाली ये व ज्या ठिकाणी मी तुला जड होईल त्याच ठिकाणी माझी स्थापना कर, असा देवीने दृष्टांत दिला. त्याप्रमाणे ताडकर सागवानी डोंगरावर गेले. तेथे त्यांना देवीचे दर्शन झाले. देवीची मूर्ती घेऊन ताडकर नागोठण्यात आले. डोक्यावरील मूर्ती जड झाली व त्या जागी त्यांनी मूर्ती स्थापित केली.
पूर्वी या ठिकाणी कौलारू मंदिर होते. काही वर्षांपूर्वी मंदिराचा व परिसराचा जीर्णोद्धार करण्यात आला. त्याचप्रमाणे मूळ मूर्ती जीर्ण झालेल्या असल्याने नवीन मूर्ती स्थापित करण्यात आली. या मंदिरात जोगेश्वरी, भैरवनाथ व व्याघ्रेश्वर अशी तीन दैवत आहेत. मंदिराच्या बाजूस असलेल्या छोट्या देवळात गणपती, मरिआई व ज्ञानेश्वर यांच्या मूर्ती आहेत. याशिवाय रामेश्वर पुरातन शिवमंदिर असून परिसरात अनेक मंदिरे आहेत.
जोगेश्वरी हे मुळात भवानी मातेचे रूप आहे. मंदिरात भैरवनाथाची मूर्तीसुद्धा आहे. त्यामुळे जोगेश्वरीला भैरवी भवानी असेही नावही आहे. चैत्र महिन्याच्या पौर्णिमेनंतर हनुमान जयंतीच्या दुसर्‍या दिवशी देवीची पालखी असते. यावेळेस देवी संपूर्ण गावातून फिरून आपल्या भक्तांना दर्शन देते. जोगेश्वरी भैरवनाथ देवस्थानच्या शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली असून नऊ दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन या ठिकाणी करण्यात आले आहे.

Check Also

‘प्रेम नगर’ है यह अपना….

हिंदी चित्रपटाने बायस्कोपपासून ओटीटीपर्यंत, सोळा एमएमपासून सत्तर एम.एम, सिनेमास्कोपपर्यंत, रस्त्यावरच्या पोस्टरपासून ते डिजिटल युगापर्यंत, मोनो …

Leave a Reply