कृषी विज्ञान केंद्राची राबगाव येथे कार्यशाळा
पाली : प्रतिनिधी
शेतीमध्ये आजकाल रासायनीक खतांचा अवाजवी व अतिरिक्त वापर होत आहे. त्यामुळे शेतीचा कस बिघडला आहे. त्यामुळे शेतकर्यांनी नैसर्गिक शेतीची कास धरावी, असे आवाहन कृषी तज्ज्ञ डॉ. मनोज तलाठी यांनी गुरुवारी (दि. 25) राबगाव येथे केले.
कृषी विज्ञान केंद्र-रोहा किल्ला आणि कृषी मित्र संघटना-सुधागड यांच्या संयुक्त विद्यमाने राबगाव ग्रामपंचायत कार्यालयात गुरुवारी परिसंवादात्मक कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत नैसर्गिक शेती या विषयावर कृषी तज्ज्ञ, कृषी संशोधकांनी उपस्थित शेतकर्यांना मार्गदर्शन केले. त्या वेळी डॉ. तलाठी बोलत होते. नैसर्गिक शेती ही काळाची गरज आहे, असे त्यांनी या वेळी सांगितले.
शास्त्रीय जोड देऊन नैसर्गिक शेती करा, पिकांवरील रोग व किडीचे उच्चाटन करण्यासाठी घरच्या घरी कीटकनाशके तयार करा, झिरो बजेट शेती करण्यावर भर द्या, असा सल्ला डॉ. तलाठी यांनी शेकर्यांना दिला.
डॉ. प्रमोद मांडवकर यांनी प्रास्ताविकात केले. रासायनिक शेतीचे दुष्परिणाम आता दिसू लागले आहेत, ते टाळण्यासाठी सर्वांनी नैसर्गिक शेतीचा सर्वोत्तम पर्याय स्वीकारला पाहिजे, असे डॉ. नामदेव म्हसकर म्हणाले. डॉ. राजेश मांजरेकर यांनी सेंद्रिय शेतीबद्दल मार्गदर्शन केले. संतोष बावधाने या शेतकर्याने शेळीपालन व कुक्कुटपालन या व्यवसायासंदर्भात मार्गदर्शन केले. तर शेतकरी सटूराम दळवी यांनी भातशेतीतील पूरक बाजू समजावून सांगितली.
शेतकर्यांनी एकपिकी शेती न करता विविध पिकी शेती केली पाहिजे. शेतीबरोबरच जोड व्यवसाय केल्यास अधिक उत्पादन व नफा मिळवू शकतो, असे यावेळी उपस्थित तज्ज्ञांनी सांगितले. तहसीलदार दिलीप रायन्नावार, तालुका कृषी अधिकारी जनाबा झगडे, सरपंच कविता वाळंज, कृषी मित्र संघटनेचे सचिव शरद गोळे, डॉ. उत्तम महाडकर, जीवन आरेकर, माधुरी भोईर, बशीर परबलकर आदींसह प्रगतशील शेतकरी या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.