Breaking News

ताकई रस्त्याचे काम रखडले

खोपोली : प्रतिनिधी

नगर परिषद हद्दीतील ताकई रस्त्याचे काम गेल्या दोन वर्षांपासून अपूर्णावस्थेत असून, त्याबाबत सर्व स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे.

साजगांव-आडोशी औद्योगिक वसाहत व संपूर्ण  पंचक्रोशीसाठी अतिशय महत्वपूर्ण असलेल्या ताकई रस्त्याचा चार किमी भाग खोपोली नगरपालिका हद्दीत येतो. नगरपालिका हद्दीतील रस्त्याचे रुंदीकरण व काँक्रीटीकरण करण्यासाठी एमएमआरडीएने दोन वर्षांपूर्वी साडेचार कोटींचा निधी मंजूर केला आहे.

सुरुवातीला वेगाने सुरू झालेल्या या रस्त्याचे काम नंतर रखडले. कधी स्थानिकांकडून जागा देण्याबाबत विरोध तर कधी वन विभागाकडून जागा हस्तांतरणाबाबतचे आक्षेप यामुळे रस्ता रुंदीकरण होण्यात अडचणी निर्माण झाल्या. त्याबाबत प्रशासन व लोकप्रतिनिधीनी एकत्रितपणे मार्ग काढला. मात्र यात चार पाच महिन्याचा कालावधी गेला. नंतर नगर परिषद प्रशासनाचे आदेश मिळूनही संबंधीत ठेकेदाराने रस्त्याचे काम जाणीवपूर्वक रखडून ठेवले असल्याचा आरोप होत आहे.

या रस्त्यासाठी जून महिन्यात या भागातील सर्वपक्षीय नेते आक्रमक झाले होते. त्यांनी आंदोलनाची तयारी सुरू केली. त्याची दखल घेत नगर परिषदेच्या मुख्याधिकार्‍यांनी संबंधीतांच्या बैठका घेऊन, ठेकेदार कंपनीला ताकई रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करण्याचे आदेश दिले होते. तरीही ताकई रस्त्याचे अर्धवट अवस्थेतील काम पूर्णत्वास येत नसल्याने सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी व परिसरातील नागरिक कमालीचे संतप्त आहेत.

ताकई रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करण्याचे आदेश संबंधीत ठेकेदाराला दिले आहेत. मात्र सतत पावसाचे वातावरण असल्याने काम होण्यास अडचणी येत आहेत. नगरपालिका प्रशासनाचे या कामाकडे विशेष लक्ष आहे.

-अनुप दुरे-पाटील, प्रशासक, नगरपरिषद-खोपोली

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply