लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून अभिनंदन अन् शुभेच्छा
पनवेल ः रामप्रहर वृत्त
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या सीकेटी महाविद्यालयाची विद्यार्थिनी व टेबल टेनिसपटू स्वस्तिका घोषची चीन येथे होणार्या वर्ल्ड टीम टेबल टेनिस स्पर्धेकरीता भारतीय संघात निवड झाली आहे. तिच्या या कामगिरीमुळे जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या शिरपेचात मानाचा आणखीन एक तुरा रोवला गेला आहे. त्यामुळे स्वस्तिकाचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी अभिनंदन करून तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये स्वस्तिकाने इयत्ता तिसरी ते बारावीपर्यंत शिक्षण घेतले. त्यानंतर आता ती खांदा कॉलनी येथील सीकेटी महाविद्यालयात बीएमएसचे प्रथम वर्षाचे शिक्षण घेत आहे. स्वस्तिकाने देशात व परदेशात झालेल्या टेबल टेनिस स्पर्धेत चमकदारी कामगिरी करीत देशाचे नाव उंचाविले आहे. दरम्यान तिच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे तिची चीन येथील चेंगडू येथे 30 सप्टेंबर ते 9 ऑक्टोबर या कालावधीत होणार्या वर्ल्ड टीम टेबल टेनिस स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तिच्या या यशाच्या मागे तिचे वडील आणि कोच संदीप घोष यांची मेहनत असून माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर यांचा मोलाचा वाटा आहे. भारतीय संघात निवड झाल्याबद्दल स्वस्तिकाचे सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्यानिमित्त तिचे जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन तथा माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी अभिनंदन केले आहे. या वेळी गव्हाण ग्रामपंचायतीचे उपसरपंच विजय घरत, सदस्या योगिता भगत, भाजप नेते जयवंत देशमुख, स्वस्तिकाचे वडील आणि कोच संदीप घोष आदी उपस्थित होते.