पनवेल : वार्ताहर
पनवेल शहरात असलेल्या रेल्वे स्टेशन, बस स्थानक, उड्डाण पुलाखाली, मंदिर, मस्जिद परिसरात मुख्य नाक्यावर, बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात बेकायदेशीररित्या भिकारी वास्तव्य करीत असतात. त्यामुळे परिसरातील रहिवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते. तसेच अनेक वेळा गुन्हेगारी प्रवृत्ती सुद्धा वाढते. तर अनेक भिकारी आजारी पडून तेथेच प्राण सोडतात. त्यामुळे पुढील सोपस्कार पोलिसांच्या माथी पडते. हे सर्व टाळण्यासाठी मी भिकारीमुक्त पनवेल करण्याचा कौतुकास्पद संकल्प सुरू केला असून याला पनवेलकरांनी सुद्धा उत्स्फूर्त प्रतिसाद देण्यास सुरूवात केली आहे. अशी माहिती पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे यांनी दिली.
लांडगे यांनी पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी यांच्या मार्गदर्शनाखाली एक विशेष पथक तयार केले आहे. हे पथक रात्रीच्या वेळी पनवेल रेल्वे स्टेशन परिसर, उड्डाण पुल, एस. टी. स्टँण्ड, शहरातून जाणार्या उड्डाणपुखालील मोकळ्या जागा, बाजारपेठ, मंदिर, मस्जिद व इतर झोपण्यासाठी सोयीस्कर असणार्या जागा या ठिकाणी ते लक्ष ठेवून तेथे भिकारी आढळल्यास तात्काळ त्यांना तेथून हटविण्यात येते व तो परिसर मोकाळा करून घेण्यात येतो. गेल्या आठ दिवसापासून हा उपक्रम सुरू केल्याने मोठ्या प्रमाणात त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
अनेक भिकार्यांनी पनवेल शहर पोलिसांची धास्ती घेवून त्यांनी आपला मोर्चा नवीन पनवेल, खांदा वसाहत, कळंबोली, कामोठे येथे वळविला आहे व रात्रीच्या वेळी ते तेथे वास्तव्यास जातात. साधारणतः पनवेल शहर परिसरात 500 च्या वर भिकारी वास्तव्यास आहेत. ते प्रमाण आता 180 पर्यंत आले आहे. अनेक वेळा अशा भिकार्यांमध्ये परदेशातील बांगलादेशीय सुद्धा त्यांच्यात वास्तव्यास असतात. यातूनच समाज विघटक घटना घडू शकते. तर अनेक वेळा लुटमारीचे प्रकार, चोर्यांचे प्रकार सुद्धा घडत असतात.
हे सर्व टाळण्यासाठी त्याचप्रमाणे काही भिकारी हे वयोवृद्ध असतात. उघड्यावर उन्हा, पावसात, थंडीत झोपल्याने त्यांना आजार जडून त्यात त्यांचा जागीच मृत्यू होतो. परंतु पोलिसांना आकस्मित मृत्यू दाखल करून पुढील सोपस्कार पूर्ण करावे लागतात. त्यात त्यांचा नाहक वेळ व पैसा सुद्धा जातो. त्याचे प्रमाण कमी व्हावे या उद्देशाने पनवेल शहर पोलिसांनी एक कौतुकास्पद
उपक्रम सुरू केला आहे. भिक मागणे हा एक व्यवसाय झाला असून त्यामागे आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व राज्यस्तरावर एक मोठी टोळी कार्यरत आहे. ती टोळी लहान मुलांचे अपहरण करून त्यांना अशा प्रकारच्या प्रवृत्ती करण्यास भाग पाडते व त्यातूनच गुन्हेगार तयार होतात. लोकांनी पैशाच्या रुपात भिक देणे बंद केल्यास मोठ्या प्रमाणात या टोळ्या तुटतील, असा पोलिसांचा विश्वास आहे. अशा प्रकारचा उपक्रम परिमंडळ 1 व परिमंडळ 2 मधील सर्वच पोलीस ठाण्यातून राबविला गेल्यास लवकरच भिकारीमुक्त नवीमुंबई म्हणून एक
वेगळी ओळख होवू शकते.
यापूर्वीही वाशी पोलीस ठाण्यांतर्गत ही मोहिम राबवून वाशी भिकारीमुक्त केले होते. तशाच प्रकारे पनवेलमध्ये सुद्धा मोहिम राबवून पनवेल भिकारी मुक्त करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
-अजयकुमार लांडगे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक
या कारवाईत भिकार्यांनी आडकाठी आणल्यास बेगर्स अॅक्ट अन्वये गुन्हा नोंदवून चेंबूर येथील बेगर होममध्ये पाठविले जाईल, तर आजारी व्यक्तींना पत्र देवून शिल आश्रम येथे दाखल केले जाईल. -शत्रुघ्न माळी, पोलीस निरीक्षक