माणगाव ः प्रतिनिधी
माणगावमधील एका उद्योजक शेतकर्याने वर्षातून तीन वेळा भाताचे उत्पादन घेण्याचा निश्चय केला आहे. त्याचा हा प्रयोग यशस्वी झाल्यावर माणगाव तालुका हा भाताचे विक्रमी उत्पादनाचे कोठार म्हणून ओळखला जाणार आहे. कोकणातील शेतकरी पावसाच्या पडणार्या पाण्यावर अवलंबून असून इथली भातशेती एकपिकी असल्याने बहुतांशी तरुणवर्ग मुंबई, सुरतमध्ये रोजगारासाठी मोठ्या प्रमाणात स्थलांतरित होतो, परंतु कोकणात वर्षातून तीन वेळा भातशेती पिकविल्यास शेतकर्यांचे आर्थिक संकट दूर होईल या दृष्टीने माणगावचे प्रसिद्ध उद्योजक तथा धनंजय राइस मिलचे मालक व शेतकरी विजयशेठ मेथा भातवाले यांनी तळेगाव येथील आपल्या दोन एकर जमिनीवर भातपिकाची लागवड सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात केली असून हे पीक तीन महिन्यांत तयार झाल्यानंतर पुन्हा याच जागेवर तीन महिन्यांत तयार होणारे कर्जत 84 जातीचे दुसरे पीक 84 दिवसांत घेतले जाणार आहे. त्यानंतर तिसरे पीक पुढील तीन महिन्यांत घेतले जाणार आहे. विजयशेठ मेथा यांनी स्वतः आपल्या जमिनीत मजुरांसोबत उतरून वर्षातून तीन वेळा भाताचे उत्पादन घेण्याचा निर्धार करीत जिल्ह्यातील शेतकर्यांपुढे वेगळा आदर्श ठेवला आहे.
चांगल्या पावसामुळे बळीराजा आनंदात
सध्या माणगाव तालुक्यात औद्योगिकीकरणासाठी भूसंपादनाचे काम वेगात सुरू आहे. त्यामुळे तालुक्यात वरकस व भातपिकाचे क्षेत्र यंदा घटले असले तरी 206 गावांतील शेतकर्यांनी 12,589 हेक्टर क्षेत्रावर भातपिकाची लागवड केली आहे. चालू वर्षी पिकाला पोषक असा पाऊस पडल्याने भाताचे पिक पोटर्यात आले असून ते फुलले आहे. त्यामुळे शेतकरी आनंदात आहे.