एक्सेल कंपनीत दुर्घटना, एकाची प्रकृती चिंताजनक
धाटाव ः प्रतिनिधी
रोह्यातील धाटाव औद्योगिक वसाहतीमधील एक्सेल कारखान्यात काम करीत असताना आगीच्या ज्वाळा अंगावर आल्याने चार कामगार जखमी झाले. त्यातील एकाची प्रकृती चिंताजनक आहे. एक्सेल इंडस्ट्रीज लि.मध्ये शनिवारी (दि. 10) दुपारी साडेचारच्या सुमारास ही घटना घडली. कारखान्यातील ड्रममधून घातक मटेरियल बाहेर काढत असताना अचानक आग लागली. आगीच्या ज्वाळा अंगावर येऊन कंत्राटी कामगार रामचंद्र ढमाल गंभीर जखमी झाला, तर हरेश तळकर किरकोळ जखमी झाला. इतर दोन जखमी कामगारांची नावे समजू शकली नाहीत. दरम्यान, रामचंद्र ढमाल यांना पुढील उपचारासाठी ऐरोली येथील नॅशनल बर्न हॉस्पिटलमध्ये दाखल केले करण्यात आले आहे, अशी माहिती कारखाना निरीक्षक केशव केंद्रे यांनी दिली. कारखाना निरीक्षक केशव केंद्रे यांनी पुढे सांगितले की, एक्सेल कारखान्यातील घटना शनिवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास घडली होती, पण कंपनी प्रशासनाने आमच्या विभागाला कळविले नव्हते. रात्री साडेआठच्या सुमारास भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अमित घाग यांनी या घटनेबद्दल माहिती दिली. त्या माहितीच्या आधारे केलेल्या प्राथमिक चौकशीतून एकूण चार कामगार फॉस्पोरस पेंटा सल्फेट या रसायनाने भाजले. त्यातील एकाची प्रकृती चिंताजनक आहे. या संदर्भात मी स्वतः कारखान्यात जाऊन दुर्घटनेची सखोल चौकशी करून अहवाल तयार केला आहे. तो वरिष्ठांना सादर करून योग्य ती कारवाई केली जाईल.
ही घटना अतिशय चिंताजनक अशी बाब आहे, पण एक्सेल कारखान्यातील अपघात नवे नाहीत. कंपनी प्रशासन जास्त उत्पादन काढण्यासाठी कमी कामगार व कंत्राटी कामगारांचा वापर करतात तसेच सुरक्षेची काळजी घेतली जात नाही. त्यामुळे आगामी काळात पर्यावरणमंत्री व उद्योगमंत्री यांची भेट घेऊन कंपनीत योग्य त्या उपाययोजना होण्यासाठी तसेच कामगारांच्या सुरक्षेसाठी आम्ही पाठपुरावा करणार आहोत.
-अमित घाग, भाजप युवा मोर्चा दक्षिण जिल्हाध्यक्ष