Breaking News

सुधागड किल्ल्यावरील श्री भोराई देवी

पाली ः धम्मशील सावंत

छत्रपती शिवरायांचा पदस्पर्श लाभलेल्या ऐतिहासिक सुधागड किल्ल्यावर विराजमान असलेली श्री भोराई देवी ही सुधागड तालुक्यासह महाराष्ट्रातील अनेकांचे श्रद्धास्थान आहे. सध्या नवरात्र काळात हजारो भाविक देवीच्या दर्शनासाठी किल्ल्यावर दाखल होत आहेत. नवरात्रोत्सवाचे यंदाचे सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे. त्यामुळे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शिवाय मंदिर व मंदिर परिसरात रंगरंगोटी, रोषणाई, रांगोळी, हार व फुलांची सजावट करण्यात आली आहे. सुधागड किल्ल्यावर प्राचीन काळातील श्री भोराई देवीचे मंदिर आहे. या देवीची स्थापना भृगू ऋषींनी केल्याचे सांगितले जाते. म्हणून या देवीला भृगू अंबा, भोरांबा, भोराई अशीही नावे आहेत. मूळ चंडीकेचे स्वरूप असणारी श्री भोराई चतुर्भुज असून तिच्या हातात त्रिशूळ, खड्ग-खेटक आणि दोन हातांमध्ये आसूड आहे. या देवीच्या पुरातन मंदिराची भोरच्या पंतसचिवांनी पुनर्बांधणी केली व याच देवीला त्यांनी आपली कुलस्वामिनी म्हणून मानले. पंतसचिव चिमणाजी रघुनाथ उर्फ नानासाहेबांनी पुत्रप्राप्ती झाल्यानंतर येथे 10 दिवसांच्या अश्विन नवरात्र उत्सवास सुरुवात झाली. त्या काळात उत्सव साजरा करण्याची जबाबदारी तालुक्याचे मामलेदार यांच्यावर होती. श्री भोराई देवस्थान मंडळाचे विश्वस्त गडावर नवरात्रोत्सव पूर्वापार पद्धतीने साजरा करीत आहेत. यानिमित्ताने मंदिरात सकाळी पूजा, अभिषेक, सायंकाळी आरती, रात्री कीर्तन असे कार्यक्रम होतात. अष्टमीच्या दिवशी गडकर्‍यांना मानाप्रमाणे नारळ व विडे दिले जातात, तर शिलंगणाच्या दिवशी पालखी निघते. नवरात्रोत्सव काळात हजारो भाविकांना प्रसादाचा लाभ दिला जातो. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून दोन वर्षांपासून प्रसाद (जेवण) देणे बंद होते. ते आता पुन्हा चालू करण्यात आले आहे. देवीच्या दर्शनासाठी किल्यावर येणारे भाविक आजुबाजूचा गर्द झाडीने नटलेला मनोहारी परिसर, वाहते धबधबे, नद्या, डोगररांगा, थंड हवा यांचाही अनुभव घेत असतात. शिवाय किल्ल्यावरील विविध ऐतिहासिक वस्तूंना भेट देतात. त्यामुळे त्यांना तिहेरी आनंद मिळतो.

Check Also

मुंबईजवळ समुद्रात बोट बुडून 13 जणांचा मृत्यू; 101 जणांना वाचवले

मुंबई : प्रतिनिधी मुंबईमधून एलिफंटाकडे जाणारी एक प्रवासी बोट बुधवारी (दि.18) सायंकाळी बुडाल्याची दुर्घटना घडली. …

Leave a Reply