आमदार प्रशांत ठाकूर यांची अधिकार्यांना सूचना;
चिखले अंगणवाडीला भेट देऊन घेतला आढावा
पनवेल ः रामप्रहर वृत्त
एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या प्रकल्पांतर्गत भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी चिखले येथील अंगणवाडीला भेट देत कुपोषणाचे समूळ उच्चाटन करून पनवेल तालुक्यातील सर्व बालके सर्वसाधारण श्रेणीत आणण्यासाठी जातीने लक्ष घालण्याच्या सूचना संबंधित अधिकार्यांना दिल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्देशानुसार तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनानुसार स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त विशेष उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्या अंतर्गत बालकांच्या पोषणाच्या दृष्टीने एक सकारात्मक पाऊल उचलत केंद्र शासनाने पाचवा राष्ट्रीय पोषण माह राबविण्याबाबतच्या सूचना महिला व बाल विकास विभागाला दिल्या होत्या. त्यानुसार 1 ते 30 सप्टेंबरदरम्यान पोषण माह अभियान राबविण्यात आले. पोषण माह अभियानांतर्गत आमदार प्रशांत ठाकूर यांनी गुरुवारी चिखले अंगणवाडीला भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी बालकांशी, गरोदर व स्तनदा मातांशी संवाद साधून अंगणवाडीच्या भौतिक सोयीसुविधांची पाहणी केली तसेच अंगणवाडी सेविका, पर्यवक्षिका व बाल विकास प्रकल्प अधिकारी यांना बालकांच्या आरोग्याबाबत सजग राहत कुपोषणाचे समूळ उच्चाटन करून पनवेल तालुक्यातील सर्व बालके सर्वसाधारण श्रेणीत आणण्यासाठी जातीने लक्ष घालून प्रयत्न करावेत, अशा सूचना केल्या व प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचा लाभ लाभार्थ्यांना मिळतो का याबाबत आढावा घेतला. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते स्वस्थ बालक स्पर्धेत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त करणार्या बालकांचा प्रमाणपत्र, खाऊ व खेळणी देऊन सत्कार करण्यात आला. कुपोषित असलेल्या बालकांना प्रोटीन पावडरचे वाटप करण्यात आले, तर गरोदर व स्तनदा मातांना प्रोटीन पावडर, बेबी केअर किटचे वाटप करण्यात आले. या उपक्रमावेळी माजी जि. प.चे सदस्य तथा भाजपचे तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, पळस्पे विभागीय अध्यक्ष अनेश ढवळे, युवा नेते योगेश लहाने, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष आनंद ढवळे, माजी नगरसेवक तेजस कांडपिळे, भाजप नेते अप्पा भागीत, चिखलेचे सरपंच नामदेव पाटील, उपसरपंच सुरेखा योगेश पाटील, सदस्य रमेश गडकरी, पद्मिनी गडकरी, विनायक पाटील, रवींद्र पाटील, सूर्यकांत पाटील, निकिता पाटील, जयश्री पाटील, कोन ग्रामपंचायतीचे सदस्य घनश्याम पाटील, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संजय भोये, बाल विकास प्रकल्प अधिकारी चेतन गायकवाड, तंटामुक्ती अध्यक्ष हिरामण पाटील, गाव कमिटी अध्यक्ष राम फडके, स्वप्नील पाटील यांच्यासह पदाधिकारी, आंगणवाडी सेविका, ग्रामस्थ उपस्थित होते.
RamPrahar – The Panvel Daily Paper