Breaking News

जीवनात मोठे होण्यासाठी ध्यास, मेहनत, आत्मविश्वास, त्याग आवश्यक

लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे प्रतिपादन

पनवेल ः रामप्रहर वृत्त

जीवनात मोठे होण्यासाठी ध्यास, मेहनत, आत्मविश्वास, त्याग यांची आवश्यकता असते. जर हे गुण तुमच्या अंगी असतील, तर तुम्ही यशस्वी व्हाल, असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी शुक्रवारी (दि. 30) येथे केले. ते महात्मा फुले कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात आयोजित कर्मवीर भाऊराव पाटील जयंती कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत होते. रयत’चे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांची 135जयंती फुले महाविद्यालयात आयोजित उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने 22 सप्टेंबरपासून विविध स्पर्धा, व्याख्याने आदी उपक्रम झाले. त्यानंतर शुक्रवारी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली मुख्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून ‘रयत’चे सचिव प्राचार्य डॉ. व्ही. एस. शिवणकर, माजी विद्यार्थी संघटनेचे सचिव परेश ठाकूर, ‘रयत’चे जनरल बॉडी सदस्य वाय. टी. देशमुख, रायगड विभागीय निरीक्षक रोहिदास ठाकूर, महाविद्यालाचे उपप्राचार्य डॉ. आर. ए. पाटील, डॉ. एन. आर. मढवी, रजिस्ट्रार अनंता जाधव, प्राध्यापक, शिक्षकेतर सेवकवर्ग, विद्यार्थी व त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ. व्ही. एस. शिवणकर म्हणाले की, महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये कर्मवीरांचे योगदान खूप मोठे असून ते खर्‍या अर्थाने शिक्षण क्षेत्रातील दूरदृष्टीचे नायक होते. त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात क्रांती केली व  ज्ञानाची  गंगा गोरगरीबांपर्यंत पोहचविली. कार्यक्रमाच्या सुरुवातीस महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश ठाकूर यांनी उपस्थितांचे स्वागत व परिचय करून महाविद्यालयाच्या प्रगतीचा आढावा घेतला तसेच रयत ही आशिया खंडातील सर्वांत मोठी शिक्षण संस्था असून  शासनाने संस्थेस क्लस्टर युनिव्हर्सिटीचा दर्जा बहाल केला आहे, असे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रवीण गायकर, डॉ. प्रफुल्ल वशेणीकर व प्रा. शरयू नाईक यांनी केले, तर उपस्थितांचे आभार उपप्राचार्य डॉ. आर. ए. पाटील यांनी मानले.

महात्मा फुले कॉलेज सभागृहास दोन कोटींची देगणी जाहीर

आपल्या मार्गदर्शनपर भाषणात लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी रयत शिक्षण संस्थेशी असणारे ऋणानुबंध व्यक्त करीत कर्मवीरांनी घालून दिलेला आदर्श आजही संस्था जोपासत कर्मवीरांचे स्वप्न पूर्ण करीत आहे याचा आपणास सार्थ अभिमान असल्याचे सांगितले. या वेळी त्यांनी संस्थेच्या व महात्मा फुले महाविद्यालयाच्या प्रगतीचे कौतुक केले आणि महाविद्यालयाच्या सभागृहास  दोन कोटी रुपये देणगी जाहीर केली.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply