उरण : वार्ताहर
पावसाळा जवळ आला की घरगुती तिखट मसाला बनविण्यात महिला वर्ग मग्न असतो. पावसाळ्यातील चार महिने पुरेल इतका घरगुती तिखट मसाला बनविण्याकडे महिला वर्गाचा कल असतो. त्यामुळेच विविध प्रकारच्या मिरच्या व त्यामध्ये लागणारी मसाला सामग्री खरेदी करताना महिला वर्गाची मसाला तयार करण्याची लगबग सध्या सर्वच गृहिणींकडून सुरू आहे. प्रत्येक मिरची, प्रकार, तिखटपणा, क्वालिटी, दर या सर्व बाबी महिला वर्ग सर्वत्र मिरची विक्रेत्यांकडे विचारताना दिसत आहेत. मिरच्यांच्या दरवाढीमुळे झणझणीत तिखट मसाला बनविताना गृहिणींच्या डोळ्यात पाणी येत आहे. सध्या उरण परिसरात तापमानाने चाळीशी पार केली आहे. त्यामुळे उन्हाचा तडाखा चांगलाच वाढला आहे. या ऋतूत तिखट घरगुती मसाला व त्याचबरोबर पापड, कुरवडी, भतवडी असे पदार्थ बनविण्यासाठी महिलांची धावपळ सुरू आहे. कडक उन्हात त्या मिरच्या वाळविल्या जातात, तसेच गिरणीत किंवा घरगुती पद्धतीनेही तिखट मसाला तयार केला जातो.
सध्या उरण शहरासह ग्रामीण भागातील बाजारात घरगुती तिखट मसाला बनविण्यासाठी लाल मिरची, तसेच त्यासाठी लागणारा मसाला हा विक्रीसाठी व्यापार्यांनी दुकाने थाटली आहेत. यातून बेगडी, देशी, गुंटूर अशा विविध जातीच्या मिरच्या, तसेच त्याच्या अधिक पटीने लागणार्या मसाल्यांची विक्री केली जात आहे. या बाजारपेठांमध्ये सध्या गृहिणींकडून खरेदीसाठी गर्दी केली जात आहे. मसाला बनविण्यासाठी लागणारे साहित्य मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी व्यापार्यांकडून आणले जाते. वेलची, तमालपत्री, काळीमिरी, लवंग आदी पदार्थांचा मसाले बनविण्यासाठी वापर केला जातो. सध्या बाजारात मिरीचीचा दर नव्वद ते दीडशे रुपये किलोपर्यंत आहे, मात्र मसाल्याचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे तिखट मासाला तयार करताना गृहिणींच्या डोळ्यात पाणी उभे राहत आहे. तिखट मसाला बनविण्यासाठी सर्वसाधारणपणे धने, जिरे, हळकुंड, लवंग, दालचिनी, मोहरी, हिंग, बदामफूल, मेथी, मसाला वेलदोडे, काळी मिरी, नाकेश्वर, रामपत्री, धोंडफूल, जायफळ, खसखस, बडीशेप, मीठ, शहाजिरे, हिरवे वेलदोडे, तमालपत्री या पदार्थांचा वापर केला जातो. बेडकी मिरची एक किलोस 100 ते 130, काश्मिरी 120 ते 150 रुपये किलो, संकेश्वरी 160 किलो, पांडी 100 रुपये किलो, लवंगी 120 किलो, हैदराबादी 160 रुपये किलो, अख्खी हळद 110 ते 140 रुपये किलो अशा भावाने आम्ही विकतो, असे यशवंत जनरल किराणा स्टोअरचे मालक यशवंत गायकवाड यांनी सांगितले.