Breaking News

रुग्णवाहिकेतून बेकायदेशीर प्रवासी वाहतूक

वाहनचालकावर पोलिसांकडून कारवाई

पनवेल : वार्ताहर – कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सर्वत्र संचारबंदी केली असल्याने आत्ता छोटीमोठी कामे करणारे नागरिक गावाकडे परतू लागले आहेत. परंतु रेल्वेसह एसटी बस सेवा व खाजगी वाहने रस्त्यावर उतरत नसल्याने अनेकांनी अत्यावश्यक सेवा म्हणून असलेल्या दुधाच्या तसेच केळी व इतर फळांची वाहतूक करणार्‍या रिकाम्या टेम्पोतून घरी जाण्याचा प्रयत्न सुरू केला असून शनिवारी (दि. 28) अशाचप्रकारे अत्यावश्यक सेवा म्हणून वापरत असलेल्या रुग्णवाहिकेतून प्रवासी भरून वाहतूक करणार्‍या वाहनचालकाला पनवेल शहर पोलिसांनी व पळस्पे वाहतूक शाखेने अडवून त्याच्याविरूद्ध कारवाई केली आहे.

कोकणासह पुणे तसेच पश्चिम महाराष्ट्रातील मोठ्या संख्येने ग्रामस्थ हे उदरनिर्वाहासाठी मुंबई व उपनगरात वर्षानुवर्षे येत असतात. परंतु सध्या देशात सुरू असलेल्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सर्वत्र संचारबंदी केली असल्याने त्यांचा कामधंदा बंद पडला आहे. जवळ असलेली पुंजीसुद्धा संपत आल्याने खाण्यापिण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. यातूनच गावाकडे परतण्यासाठी गावाकडून येणार्‍या दुधाच्या तसेच फळभाजींच्या अत्यावश्यक सेवा असलेल्या रिकाम्या टेम्पोतून तसेच अत्यावश्यक सेवा असलेल्या रुग्णवाहिकेतून प्रवास करून हे घरी परतू लागले आहेत. शनिवारी (दि. 28) अशाचप्रकारे एका रुग्णवाहिकेत प्रवासी भरून पळस्पा फाटा येथून जात असताना पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे, पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी व पळस्पे वाहतूक पोलिसांनी सदर अ‍ॅम्ब्यूलन्स अडवून वाहनचालकाविरोधात कारवाई केली आहे.

कोरोनाचा प्रसार होण्याची शक्यता

कळंबोली मॅकडोनल्डसमोर नाकाबंदीत वाहतूक शाखा व कळंबोली पोलिसांनी हा प्रकार उघडकीस आणला आहे. रुग्णवाहिकेत बसलेले प्रवासी कुठल्याही प्रकारचे मास्क न वापरता बसलेले होते. अशा प्रकारच्या वाहतूकीमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव शहराकडून ग्रामीण भागाकडे वळण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply