Breaking News

पनवेलमध्ये पाणीटंचाईमुळे वाढली पिंपांची मागणी

पनवेल : बातमीदार

राज्यासह पनवेल परिसरातही पाणीटंचाईचे दाट सावट पसरले आहे. प्रत्येक प्रभागात एक दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. परिणामी रहिवाशांनी मिळेल ते पाणी साठवून ठेवण्यासाठी पिंपाची जोरदार खरेदी सुरू केल्यामुळे बाजारात पिंपांना असणारी मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

यंदा राज्यभर सगळीकडेच दुष्काळचे सावट आहे. त्यामुळे जेव्हा कधी पाणी येईल तेव्हा ते साठवून ठेवण्यासाठी म्हणून पनवेलवासीयांनी मोठ्या प्रमाणावर पिंप खरेदी सुरू केली आहे. स्टीलच्या मोठ्या टाकीबरोबरच प्लॅस्टिक, लोखंडी पिंप खरेदीवर भर दिला आहे. दुकानदारही चढ्या भावाने या पिंपांची विक्री करत आहेत. सिन्टेक्सच्या 325 लिटर क्षमतेची चौकोनी प्लॅस्टिक टाकी 1450 ते 1700 रुपयांच्या, तर 500 लिटरच्या पाण्याच्या टाकीची किंमत 2250 ते तीन हजार रुपयांच्या दरम्यान आहे. या टाक्यांची खरेदी पाच ते सहा टक्क्यांनी वाढली असल्याचे अर्पण सिरॅमिक्सचे नवीन पी. यांनी सांगितले, पण ग्राहकांची सगळ्यात जास्त मागणी आहे ती प्लॅस्टिकच्या पिंपांना. 250 ते 300 लिटरच्या एका पिंपाची किंमत सुमारे 700 ते 1000 रुपयांदरम्यान आहे. पाणीटंचाईमुळे पाणी साठवून ठेवण्यासाठी सर्वसामान्यांकडून पिंपांना असणारी मागणी वाढली आहे. बाजारातील अनेक हार्डवेअर आणि प्लंबरच्या दुकानांमधून या पिंपांची मागणी 30 ते 40 टक्क्यांनी वाढल्याने दुकानदारांचा धंदा तेजीत आहे. पाण्याची टंचाई स्थानिकांच्या घशाला कोरड पाडत आहेच, पण त्याचबरोबर खिशावरही ताण पाडत असल्याचा सूर येथील त्रस्त रहिवासी करत आहेत. त्यामुळे पिंपाच्या खरेदीला जोर चढला आहे.

Check Also

पनवेल मनपा प्रभाग समित्यांवर भाजप महायुतीचे चारही उमेदवार विजयी

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका प्रभाग समित्यांच्या सभापतिपदाची निवडणूक मंगळवारी (दि.११) पार पडली. या निवडणुकीत …

Leave a Reply