Breaking News

पांढर्‍या कांद्याच्या बियाण्याचा तुटवडा

अलिबाग : प्रतिनिधी

मागच्या वर्षी पडलेल्या अवकाळी पावसामुळे अलिबागच्या पांढर्‍या कांद्याचे बियाणे खराब झाले होते. त्यामुळे  अलिबागच्या पांढरा कांदा उत्पादक शेतकर्‍यांना यंदा पांढर्‍या कांद्याच्या बियाण्याचा मोठा तुटवडा भासतो आहे. शेतकर्‍यांना बियाण्याचा तुटवडा भासू नये, यासाठी पांढर्‍या  कांद्याची  सीडबँक सुरू करण्याची कृषी विभागाची योजना आहे. पुढल्या वर्षाच्या लागवडीसाठी येणार्‍या पिकामधून बियाणे बाजूला ठेवले जाते. हे बियाणे जास्त प्रमाणात जमा होत नाही. कांद्या पातीला येणार्‍या बोंडामध्ये हे बी तयार होते, ते काढल्यानंतर ते जपून ठेवावे लागते. थोड्याशा हलगर्जीपणामुळे ते अनेकवेळा खराब होते. गेल्या वर्षी पडलेल्या अवकाळी पावसाने हे बियाणे वाया गेले आहे. त्यामुळे येथील शेतकर्‍यांना बियाण्याचा तुटवडा जाणवत आहे. अलिबाग तालुक्यातील कार्ले, खंडाळा, वाडगाव यासारख्या गावांमध्ये फक्त 230 हेक्टर क्षेत्रावर पांढर्‍या कांद्याची लागवड केली जाते. बियाण्याच्या कमतरतेमुळे  क्षेत्र वाढविण्यावर मर्यादा येत असल्याने कृषी विभागाने सीडबँकेच्या माध्यमातून बियाणे जमवून ते नव्याने लागवड करणार्‍या शेतकर्‍यांना देण्यात येणार आहे. यात टप्प्या टप्प्याने वाढ करण्याचा प्रयत्न कृषी विभागाचा आहे. अलिबागमधील खारट, दमट हवामानामुळे पांढर्‍या कांद्याचे गुणधर्म अद्याप मुळस्थितीत आहे. गुणवत्ता संभाळण्यासाठी येथील शेतकरी आपल्याच शेतातील बीज काढून पुढील वर्षाकरीता लागवडीसाठी ठेवतात. हे बीज कमी असल्याने लागवडीखालील क्षेत्राला मर्यादा येतात. जास्तीत जास्त शेतकर्‍यांना लागवड करता यावी, यासाठी कृषी विभागाच्या पुढाकारातून पांढर्‍या कांद्याची सीडबँक सुरू करण्यात येणार आहे. त्याचबरोबर शास्त्रीय पद्धतीने लागवड करण्यासाठी संशोधनही करता येणार आहे. जीआय मानांकन मिळाल्यानंतर कृषी विभागाने पांढरा कांदा लागवडीचा नियोजनबद्ध कार्यक्रम हाती घेतला असून त्याची सुरुवात येत्या हंगामापासून होणार आहे. अलिबागच्या या पांढर्‍या कांद्याला जीआय मानांकन मिळाल्याने बाहेरच्या शेतकर्‍यांना ही विक्री करता येणार नाही. अलिबाग तालुक्यातील जीआय मानांकनासाठी नोंदणी झालेल्या 14 गावातील 350 शेतकर्‍यांना तयार होणारा ’सफेद कांदा’ हा या मानांकनाखाली विकता येईल.

मागच्या वर्षी मध्येच पाऊस पडल्याने पांढर्‍या कांद्याचे बियाणे खराब झाले होते. त्यामुळे यावर्षी आम्हालाच बियाणे कमी पडणार आहे, अनेक शेतकरी बियाणे मागण्यासाठी येतात, परंतु तुटवडा असल्याने देता येत नाही. भविष्यात बियाण्याची मोठी कमतरता भासणार आहे, हे लक्षात घेवून कृषी विभागाने यावर वेळीच उपाययोजना करणे गरजेचे आहे.

-सतीश म्हात्रे, कांदा उत्पादक शेतकरी, कार्ले, ता. अलिबाग

पांढर्‍या कांद्याच्या बियाण्याची टंचाई भासते आहे. त्यामुळे बीज टंचाईवर मात करण्यासाठी आम्ही सीड बँकेची संकल्पना राबवत आहोत, जेणेकरून अधिकाधिक उत्पादनाबरोबरच त्यावर संशोधन करणे सोपे जाईल.

-डी. एस. काळभोर, कृषी उपसंचालक, रायगड

Check Also

पनवेल महापालिकेच्या विविध विकासकामांचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते भूमिपूजन

पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका महाराष्ट्र राज्य, देश अशा सर्व स्तरावर पुढे जाण्यासाठी आगेकूच …

Leave a Reply