कशी करणार नव्या जीवनाची सुरुवात?
पनवेल : प्रतिनिधी : विवाह नोंदणी प्रमाणपत्र न दिल्याने नव्या जीवनाची सुरुवात नव्या विचाराने कशी करणार, असा प्रश्न रायगड जिल्हा धर्मादाय संस्था अंतर्गत 9 मे रोजी 2018 रोजी अलिबाग तालुक्यातील झिराड येथील तपस्वी रामजी लक्ष्मण घरत समाज मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या सामुदायिक विवाह सोहळ्यात विवाह करणार्या 21 जोडप्यांना पडला आहे. त्यामुळे अनेक शासकीय कामासाठी त्यांना अडचणी येत आहे. आम्ही लवकरच प्रमाणपत्र देऊ असे फक्त सांगण्यात येत आहे.
मुलीच्या लग्नाची चिंता किंवा तिच्या विवाहासाठी लागणारा खर्च हे आत्महत्या करण्याचे एक कारण असल्याचे दिसून आल्याने धर्मादाय आयुक्त महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी परिपत्रक 533 नुसार प्रत्येक जातीधर्मातील धार्मिक स्थळे व संस्था यांची जिल्हास्तरीय समिती गठित करून जमा झालेला निधी गरिबांचे सामुदायिक विवाह करण्यासाठी वापरावा, असे आदेश दिले. रायगड जिल्ह्यातील शेतकरी, मजूर, आदिवासी, दुर्बल घटक, गरीब भटके आणि अनाथांच्या पाल्यांच्या लग्नकार्यासाठी मदत व्हावी यासाठी रायगड जिल्हा धर्मादाय संस्था अंतर्गत सामुदायिक विवाह बुधवार 9 मे 2018 रोजी अलिबाग तालुक्यातील झिराड येथील तपस्वी रामजी लक्ष्मण घरत समाज मंदिरात आयोजित करण्यात आला होता.
रायगडचे सहाय्यक धर्मादाय आयुक्त डी. के. पाटील यांच्या उपस्थितीत या वेळी अलिबाग, पनवेल, पेण, उरण, कर्जत आणि खालापूर तालुक्यातील 21 जोडप्यांचा सामुदायिक विवाह करण्यात आला. याचा मुख्य उद्देश नव्या जीवनाची सुरुवात नव्या विचाराने करावी हा होता. सर्वधर्मीय, सर्व जातीय, आंतरजातीय सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करणार्या शासनाने या जोडप्यांना वर्ष झाले तरी विवाह नोंदणी प्रमाणपत्र दिलेले नाही. त्यामुळे आज त्यांना नव्या जीवनाची सुरुवात नव्या विचाराने करताना शासन दरबारी अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.