खोपोली : जयवंत माडपे
खोपोली नगर परिषद हद्दीतील लव्हजी रेल्वेस्थानकापासून अवघ्या दहा ते पंधरा मिनिटांच्या अंतरावर निसर्गाच्या सानिध्यात भवानी मातेचे मंदिर भाविकांचे लक्ष वेधून घेते. नवरात्रोत्सवात नऊ दिवस हे मंदिर रात्रंदिवस भक्तांसाठी खुले असते.
भवानी मातेच्या मंदिराकडे जाण्यासाठी शेतातून पाय वाटेने जावे लागते. मार्गक्रमण करताना सह्याद्रीच्या पर्वतरांगा व त्यावर पसरलेली हिरवळ नेत्रसुख देते. मनशांतीसाठी या मंदिराकडे आपोआप पावले वळतात.
लव्हेज गावची ग्रामदेवता भवानी माता नवसाला पावते, अशी भक्तगणांची श्रद्धा आहे. कुठलेही शुभकार्य करताना ग्रामस्थ मातेचा कौल घेतात. शहराच्या विविध भागातून त्याचप्रमाणे शेजारील तालुक्यांतून भक्तगण सहकुटुंब देवीच्या दर्शनासाठी येत असतात, तर माहेरवाशिणी आवर्जून देवीची खणा-नारळाने ओटी भरतात. नवरात्रीमध्ये मोठ्या संख्येने भाविकांची गर्दी मंदिरात व परिसरात दिसून येते.
पूर्वी देवीचे मंदिर कौलारू होते. काही वर्षांपूर्वी या मंदिराचा ग्रामस्थांनी जीर्णोद्धार केला व मंदिराला आकर्षक स्वरूप प्राप्त झाले. अगदी लव्हजी स्थानकातून पाहिले असता मंदिराचा कळस व ध्वज दिसून येतो. मंदिराच्या जीर्णोद्धारावेळी इंग्रजांच्या काळातील नाणी खोदकामात आढळून आली होती, अशी ग्रामस्थांकडून माहिती मिळतेे.
दसर्याच्या दिवशी या मंदिरातून पालखी निघते. ती गावातून वाजत गाजत फिरून हनुमान मंदिरात या पालखी सोहळ्याचा समारोप होतो. नंतर गावातील पोलीस पाटलांच्या ओटीवर ग्रामस्थ एकत्र येत सोने लुटतात. ही शेकडो वर्षांची परंपरा आजही या गावात सुरू आहे. या निमित्ताने गावात एकोपा पहावयास मिळतो.
भवानी माता नवरात्र मंडळातर्फे गावात दांडिया गरबाचे आयोजन करण्यात आले आहे. या मंडळातर्फे विविध स्पर्धा घेण्यात येत असतात तसेच आकर्षक बक्षिसांची लूट असते.
Check Also
महाराष्ट्रातूनही ५० लाख घुसखोर बांगलादेशी बाद होणार -किरीट सोमय्या
पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय निवडणूक आयगाच्या वतीने विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) अभियान राबविण्यात येत आहे. …
RamPrahar – The Panvel Daily Paper