परेश ठाकूर व डॉ. गिरीश गुणे यांच्या हस्ते शुभारंभ
पनवेल ः रामप्रहर वृत्त
दिवाळी सणाचे सर्वांना वेध लागले असून सण मोजक्याच दिवसांवर आला आहे. त्या पार्श्वभूमीवर गेल्या दहा वर्षांपासून रोटरी क्लब ऑफ सेंट्रलच्या वतीने राबवला जाणारा ‘दिवाळी ड्रायफ्रूट प्रोजेक्ट’ सुरू झाला आहे. या उपक्रमाचे उद्घाटन महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते रविवारी (दि. 9) झाले. या वेळी त्यांनी हा उपक्रम समुदाय विकासासाठी महत्त्वाचा असून हा असाच सुरू राहिला पाहिजे असे प्रतिपादन केले. रोटरी क्लब ऑफ सेंट्रलच्या वतीने दिवाळी ड्रायफ्रूट प्रोजेक्ट हा गेल्या दहा वर्षांपासून राबवला जात आहे. कोरोना महारमारीमुळे दोन वर्ष हा उपक्रम राबवण्यात आला नव्हता, मात्र यंदाच्या वर्षापासून दिवाळी ड्रायफ्रूट प्रोजेक्ट हा उपक्रम पुन्हा सुरु करण्यात आला आहे. शहरातील दांडेकर हॉस्पिटलमध्ये हा उपक्रमाचा शुभारंभ माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते आणि क्लबचे मार्गदर्शन डॉ. गिरीश गुणे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. दिवाळी ड्रायफ्रूट प्रोजेक्टच्या माध्यमातून आपल्या नातेवाईकांना, तसेच ऑॅफीसमधील कर्मचार्यांना दिवाळीला भेट म्हणून देण्यासाठी ड्रायफू्रट हे अगदी माफक दरात उपलब्ध करून देण्यात येतात. रोटरी क्लब ऑफ सेंट्रल हे या या उपक्रमातून मिळणार्या पैशातून विविध सामाजोपयोगी उपक्रम राबवतात. या वेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष लक्ष्मण पाटील, प्रोजेक्ट संचालक सुनिल गाडगीळ, रतन खारोल, सेक्रेटरी अनिल ठकेकर आदी उपस्थित होते.