Breaking News

रश्मी शुक्लांच्या अहवालामुळे ठाकरे सरकारची तंतरली : भातखळकर

मुंबई ः प्रतिनिधी
आयपीएस अधिकारी रश्मी शुक्लांच्या फोन टॅपिंगसंदर्भातील अहवालावरून सध्या सत्ताधारी व विरोधकांत जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर भाजप नेते अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकार व राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. रश्मी शुक्लांच्या अहवालामुळे ठाकरे सरकारची चांगलीच तंतरली आहे. खंडणीखोरीचे बिंग फुटले आहे. अहवालात काहीच नाही, असे सरकारचे म्हणणे असेल, तर त्यांनी अहवाल जनतेसमोर ठेवावा. अहवाल गुलदस्त्यात ठेवून दूध का दूध और पानी का पानी कसे होईल, असा घणाघात भाजप नेते अतुल भातखळकर यांनी केला आहे.
तसेच, रश्मी शुक्ला यांनी तयार केलेला टॉप सिक्रेट रिपोर्ट मी फोडला नाही, तो देवेंद्र फडणवीस यांनीच फोडला. असं आता घाबरून नवाब मलिक म्हणत आहेत. नवाब मलिक जर रिपोर्ट फोडला असेल तर फोडला म्हणा घाबरता कशाला? आम्हीतर तेव्हाच सांगितलं आहे की, आमच्यावर कारवाई करा फोडला म्हणून, गुन्हा दाखल करा. तुम्ही आता कशाला एवढं घाबरत आहात? अगोदर रिपोर्ट पब्लिश तर करा. रिपोर्टमध्ये काही दम नाही तर रिपोर्ट पब्लिश करा आणि रिपोर्टप्रमाणे कारवाई करा. पण स्वतःच्या खंडण्या व स्वतःचा भ्रष्टाचार लपवायचा यामुळे अशाप्रकारची वक्तव्य नवाब मलिक व राष्ट्रवादी करते आहे. तुमच्या पायाखालची आता वाळू सरकली आहे, हेच तुमच्या या घाबरट वक्तव्यांवरून सिद्ध होत आहे. असंही भातखळकर म्हणाले आहेत.
दरम्यान, ‘फोन टॅपिंग’ प्रकरणात राज्य गुप्तवार्ता विभागाने (एसआयडी) केलेल्या तक्रारीआधारे सायबर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात शासकीय गुपिते अधिनियमानुसार (ऑफिशियल सिक्रेट अ‍ॅक्ट) शुक्रवारी गुन्हा नोंदवला. या गुन्ह्याचा तपास सायबर विभागाचे सहायक आयुक्त करणार आहेत.
तर, राज्य गुप्तचर विभागाच्या तत्कालीन आयुक्त रश्मी शुक्ला यांनी सरकारची पूर्वपरवानगी न घेताच पोलीस अधिकारी व अन्य लोकांचे फोन टॅप केले होते असा आरोप अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला होता.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply