Breaking News

फणसाड अभयारण्यात शेकरूंची संख्या वाढली

मुरूड ः प्रतिनिधी 

मुरूड तालुक्यात असणारे सुप्रसिद्ध फणसाड अभयारण्यात शेकरू या दुर्मिळ प्रजातीच्या प्राण्यांची संख्या वृद्धींगत होत आहे. भीमाशंकर अभयारण्य पाठोपाठ आता फणसाड अभयारण्यसुद्धा शेकरुंसाठी प्रसिद्ध होत आहे. शेकरू म्हणजेच खारुताईपेक्षा मोठ्या आकाराने असणारा प्राणी. फणसाड अभयारण्य हे पाच हजार 300 हेक्टर परिक्षेत्रात पसरले असून रोहा व मुरूड तालुक्यात याची व्याप्ती आहे.घनदाट अशा या अभयारण्यात उंच अशी निलगिरी वृक्षांची मोठमोठी झाडे आहेत. अभयारण्यातील उंच झाडांवर शेकरू या प्राण्यांची घरटी आढळून येत आहेत. पोषक वातावरण, मोठ्या प्रमाणात पाऊस यामुळे शेकरूंना आवश्यक लागणारे खाद्य या अभयारण्यात असल्याने शेकरूंची संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे.एक शेकरू स्वतःला राहण्यासाठी किमान पाच ते सहा घरटी बनवत असतो. हा प्राणी फार भित्रा तसेच लाजाळू प्राणी आहे.चिखलगान भागात भरपूर शेकरूंची संख्या असून येथे पर्यटक नेहमी गर्दी करून दुर्बिणीच्या साह्याने न्याहाळतात. शेकरूंचेआवडते खाद्य हे गारंबीचा शेंगातील आतला गर असून फळे, कोवळा पाला, जांभूळ वादाची फळे हे आहेत. फणसाड अभयारण्यात शेकरूंची जतन व संवर्धन यासाठी विशेष काळजी घेतली जात असल्याची माहिती फणसाड प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. या अभयारण्यात बिबट्या, सांबर, हरीण, भेकर, पिसोरी, रानमांजर, खवले मांजर, लंगूर माकडे आदी प्रजातीचे वन्यजीव राहत आहेत. त्याचप्रमाणे येथे रानगव्यांची संख्यासुद्धा वाढत आहे. विविध पक्षी व फुलपाखरूंचीसुद्धा मुबलक संख्या असल्याने पर्यटकांची सर्वात जास्त पसंतीस फणसाड अभयारण्य असल्याचे दिसून येत आहे.

शिकारीचे प्रमाण शून्यावर

शिकारीचे प्रमाण या भागात शून्य टक्क्यावर आहे. रात्रीची गस्त व जागता पहारा असल्याने शिकारीला जाणे टाळले जाते.काही दिवसांपूर्वीच शिकारीच्या बेताने आलेल्या लोकांना पकडण्यात आले. त्यामुळे येथे फणसाड अभयारण्य प्रशासनची दहशत निर्माण झाली आहे.

Check Also

पनवेलमध्ये भाजप स्थापना दिन उत्साहात साजरा

पनवेल : रामप्रहर वृत्तजगातील सर्वात जास्त सदस्य असलेल्या भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस सोमवारी (दि. …

Leave a Reply