पाली : रामप्रहर वृत्त
सुधागड तालुक्यातील कोरोनोचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पाली शहरात शनिवार (दि.15) पासून नऊ दिवसांचा जनता कर्फ्यु लावण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार दिलीप रायण्णावार यांनी गुरुवारी (ता.13) दिली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आमदार रविशेठ पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी (दि. 12) पाली तहसील कार्यालयात महत्वपूर्ण बैठक घेण्यात आली. या बैठकीत आमदार रविशेठ पाटील, तहसीलदार दिलीप रायण्णावार व भाजप दक्षिण रायगड जिल्हा उपाध्यक्ष राजेश मपारा यांनी व्यापारी, नागरिक व सर्वपक्षीय नेते यांच्यासोबत चर्चा केली. त्यानंतर पाली शहरामध्ये शनिवार (दि. 15) पासून रविवार (दि. 23) पर्यंत जनता कर्फ्यू लागू करण्याबाबत सर्वांच्या सहमतीने निर्णय घेण्यात आला. या जनता कर्फ्युमध्ये फक्त औषधांची दुकानेच पूर्णवेळ खुली राहणार आहेत. तसेच सकाळी 11 वाजेपर्यंत फक्त दुधाची दुकाने खुली राहतील असे तहसीलदार दिलीप रायण्णावार यांनी स्पष्ट केले. समाजाच्या हितासाठी सर्वांनी एकत्र येऊन कोरोनाच्या या संकटाला परतावून लावू या, असे आवाहन आमदार रविशेठ पाटील यांनी या वेळी उपस्थितांना केले.
- कोरोना वाढतोय
सध्या सुधागड तालुक्यात कोरोनाचे 132 सक्रिय रुग्ण आहेत. तालुक्यात आत्तापर्यंत कोरोनाचे 981 रुग्ण झाले असून 807 रुग्ण बरे झाले आहेत. आणि तब्बल 42 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सर्वानुमते जनता कर्फ्युचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे कोरोना रूग्णांच्या वाढत्या संख्येला आळा बसू शकेल. सर्वांनी जनता कर्फ्यु यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे.
-दिलीप रायण्णावार, तहसीलदार, पाली-सुधागड