रब्बी पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने दिवाळीपूर्वी शेतकर्यांच्या खात्यात पीएम किसान सन्मान निधीची रक्कम जमा केल्यानंतर आणखी एक आनंदाची बातमी दिली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने रब्बी पिकांच्या किमान आधारभूत किमतीत (एमएसपी) वाढ केली आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी मंगळवारी (दि. 18) येथे पत्रकार परिषदेत दिली.
केंद्र सरकारने गहू, जव, हरभरा, मसूर, मोहरी आणि सूर्यफूल या पिकांच्या नवीन किमान आधारभूत किमतीमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. गव्हाच्या एमएसपीमध्ये 110 रुपये प्रति क्विंटलने वाढ करण्यात आली आहे. याशिवाय सरकारने जव 100 रुपये, हरभरा 105 रुपये, मोहरी 400 रुपये, मसूर 500 रुपये आणि सूर्यफुलाच्या एमएसपीमध्ये 209 रुपयांची वाढ केली आहे.
गव्हाच्या एमएसपीमध्ये 110 रुपये प्रति क्विंटलने वाढ केल्याने आता रब्बी हंगाम 2023-24साठी गहू 2,125 रुपये प्रति क्विंटल दराने खरेदी केला जाणार आहे. जवाचा जुना एमएसपी 1,635 रुपये होता. यामध्ये 100 रुपयांची वाढ करण्यात आल्याने आता जव 1,735 रुपये प्रति क्विंटल दराने खरेदी केला जाणार आहे. हरभर्याचा जुना एमएसपी 5,230 रुपये होता, ज्याच्या एएसपीमध्ये 105 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे हरभर्याची नवीन एमएसपी 5,335 रुपये प्रति क्विंटल असणार आहे. मसूरचा जुना एमएसपी 5,500 रुपये प्रति क्विंटल होता, ज्यामध्ये 500 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे मसूराला 6,000 रुपये प्रति क्विंटल भाव मिळणार आहे. मोहरीची एमएसपी प्रति क्विंटल 400 रुपयांनी वाढवून 5050 रुपयांवरून 5450 रुपये प्रति क्विंटल करण्यात आली आहे, तर सूर्यफुलाच्या एमएसपीमध्ये 209 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे त्याचा एमएसपी 5441 रुपयांवरून 5650 रुपये प्रति क्विंटल झाला आहे.