आरपीआय युवक जिल्हाध्यक्ष प्रमोद महाडीक यांचे बांधकाममंत्र्यांना साकडे
खालापूर : प्रतिनिधी
खोपोली विश्रामगृह गेल्या 10 वर्षापासून पडीक अवस्थेत असून, इमारतीची नासधूस झाली आहे. मोक्याच्या ठिकाणी असलेली ही जागा हडप होण्याची भीती असल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यात असलेल्या या विश्रामगृहाची जागा खोपोली नगर परिषदेस हस्तांतरीत करून तेथे सुसज्ज मोठे गार्डन उभारावे, अशी मागणी आरपीआयचे युवक जिल्हाध्यक्ष प्रमोद महाडीक यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. प्रमोद महाडीक यांनी नुकतीच ना. रवींद्र चव्हाण यांची डोंबिवली येथील कार्यालयात सोमवारी (दि. 24) भेट घेऊन त्यांना मागणीचे निवेदन दिले. आरपीआयचे जिल्हाध्यक्ष जगदीश गायकवाड, खोपोली शहर अध्यक्ष नितीन वाघमारे यावेळी उपस्थित होते. मुंबई-पुणे महामार्ग तयार करताना ब्रिटीशांनी मुक्कामासाठी खोपोलीची निवड केली होती. त्यावेळी ब्रिटीश अधिकार्यांना विश्रांतीसाठी खोपोलीत डाक बंगला तयार करण्यात आला होता. मुंबई-पुणे महामार्गाला लगत मोक्याच्या ठिकाणी अडीच एकर जागेत हे विश्रामगृह आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यात असलेल्या या विश्रामगृहाची सध्या अतिशय दूरवस्था झाली आहे. विश्रामगृहाची संरक्षक भिंत ढासळलेली आहे. विश्रामगृहाच्या लोखंडी प्रवेशद्वाराला मोठमोठे दगड लावून आधार देण्यात आला आहे. विश्रामगृहाचा परिसर पूर्णपणे पालापाचोळा आणि कचर्याने भरून गेला आहे. याठिकाणी खानसामा, सुरक्षारक्षक नसल्याने रात्रीच्या वेळी इमारतीचा गैरवापर होत आहे. आज खोपोलीत जागेचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे मोक्याच्या ठिकाणी असलेली ही अडीच एकर जागा हडप होण्याची शक्यता आहे, असे महाडीक यांनी निवेदनात म्हटले आहे. खोपोली शहर आणि शिळफाटा उपशहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या या विश्रामगृहाच्या जागेत सुसज्ज गार्डन उभारल्यास मुले आणि ज्येष्ठ नागरिकांच्या विरंगुळ्याची सोय होईल, तसेच शहराच्या सौंदर्यातही भर पडेल. सुसज्ज गार्डन उभारण्यासाठी विश्रामगृहाची जागा सार्वजनिक बांधकाम विभागाने खोपोली नगर परिषदेस हस्तांतरीत करावी, असे प्रमोद महाडीक यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.