कर्णधार अजिंक्य रहाणेची भावना
मुंबई : प्रतिनिधी
‘माझ्या धावांमुळे जेव्हा संघ जिंकतो, तेव्हा त्या माझ्यासाठी खूप खास असतात. माझ्या वैयक्तिक कामगिरीपेक्षा कसोटी सामना आणि मालिका जिंकणे हे माझ्यासाठी नेहमीच महत्त्वाचे असते,’ असे ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऐतिहासिक विजय मिळविणार्या भारतीय संघाचा कर्णधार अजिंक्य रहाणेने म्हटले आहे.
अॅडलेडला फलंदाजांच्या हाराकिरीमुळे भारताला मानहानीकारक पराभवाला सामोरे जावे लागले, परंतु मेलबर्न कसोटीत कर्णधार रहाणेने ऑस्ट्रेलियाविरुद्ध दिमाखदार शतक साकारले. याच शतकाने मालिकाविजयाची पायाभरणी केल्याचे रहाणेने नमूद केले.
रहाणेचे लॉर्ड्सवरील शतक आणि मेलबर्नवरील शतकाची चाहते तुलना करीत आहेत. याबाबत रहाणे म्हणाला, शतकांची तुलना कशी करावी, हेच मला कळत नाही, परंतु आता मला त्याचे महत्त्व कळू लागले आहे. अॅडलेडच्या दारुण पराभवानंतर मेलबर्नचे शतक हे मालिकेच्या दृष्टीने महत्त्वाचे होते. त्यामुळेच मेलबर्नचे शतक अतिशय खास ठरते.