नेरळ पोलिसांची कारवाई; गाडीसह साडेचार लाखाचा मुद्देमाल हस्तगत
कर्जत : बातमीदार
तालुक्याचे शेवटचे टोक असलेल्या बेडीसगाव (ता. कर्जत) येथे एका गोदामात बंदी असलेला गुटखा आणि तंबाखूमिश्रित सुगंधी सुपारी यांचा साठा करण्यात आला होता. नेरळ पोलिसांनी तेथे धाड टाकून दीड लाखाचा गुटखा जप्त केला असून, त्या ठिकाणी असलेल्या गाडीसह साडे चार लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
कर्जत तालुक्यातील शेलू ग्रामपंचायत हद्दीतील बेडीसगाव या गावात आणि वांगणी या ठाणे जिल्ह्यातील गावाला लागून असलेल्या आदिवासी वस्तीत गुटखा साठवून ठेवला असल्याची माहिती नेरळ पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रतीलाल तडवी, रवींद्र शेगडे, राम शीद यांच्यासह पोलीस पथकाने बेडीसगाव येथे छापा टाकला. यावेळी बेडीसगाव येथील गाझी फार्म हाऊसमध्ये साठवून ठेवलेला गुटखा आणि तंबाखू मिश्रित सुगंधी सुपारी यांचा मोठा साठा पोलिसांनी हस्तगत केला. पोलिसांनी त्यावेळी एजाज अहमद वल्स मोहम्मद इसाक या मूळ कौसा मुंब्रा येथे राहणार्या आणि गुटख्याच्या बेकायदा साठा करणार्या गोदाम मालकाला ताब्यात घेतले. सर्व माल नेरळ पोलीस ठाणे येथे आणल्यानंतर अन्न आणि सुरक्षा अधिकार्यांना पाचारण करण्यात आले. पेण येथील अन्न सुरक्षा अधिकारी देवानंद गोपाळ वीर यांनी त्याबाबत नेरळ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली.
बेडीसगाव येथील गाझी फार्महाऊसमध्ये शासनाने बंदी घातलेली यश गोल्ड ही तंबाखू मिश्रित सुगंधी सुपारी, स्वीयिंग सेंटेंड सुपारी, बनारस सेंटेंड सुपारी या गुटखा प्रकारातील पाकीट यांचा दीड लाख रुपयांचा साठा तसेच ग्लिसरीन, क्विविम आणि पॅरॅफिन असे साहित्य आणि टेम्पो गाडी नेरळ पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. याप्रकरणी महाराष्ट्र सरकारने बंदी घातलेल्या आणि वाहतुकीस बंदी असलेली तंबाखू, सुगंधित सुपारी यांचा साठा केल्याबद्दल अन्न सुरक्षा आणि मानके कायदा 2006चे कलम 59 प्रमाणे नेरळ पोलीस ठाणे येथे एजाज अहमद वल्स मोहमद इसाक याच्यावर भादवी कलम 188, 273, 328 खाली गुन्हा नोंद केला असून, आरोपीला अटक करण्यात आली आहे. हवालदार सचिन फरांदे अधिक तपास करीत आहेत.