भारतीय वंशाचा पंतप्रधान ब्रिटनमध्ये विराजमान झाल्यानंतर इतिहासाचे एक वर्तुळ पूर्ण झाल्याची भावना कुठल्याही भारतीय मनात घर करून राहील हे स्वाभाविकच म्हटले पाहिजे. ज्या इंग्लंड बेटावरील फिरंगी साहेबाने भारतावर दीडशे वर्ष राज्य केले, ज्या ब्रिटिश साम्राज्यावरील सूर्य कधीही मावळत नव्हता, त्या साम्राज्याच्या पंतप्रधानपदी भारतीय वंशाचा युवक विराजमान झाला ही तमाम भारतीयांसाठी अभिमानाची बाब मानली पाहिजे. इंग्लंडमधील साऊथहॅम्पटन भागात जन्मलेले, ऑक्सफर्ड आणि स्टॅनफर्ड विद्यापीठांत उच्च विद्या प्राप्त केलेले 42 वर्षांचे ऋषी सुनक अखेर ब्रिटनचे पंतप्रधान झाले आहेत. ब्रिटिश साम्राज्याचे अधिपती किंग चार्ल्स तृतीय यांची बकिंगहॅम पॅलेस येथे अधिकृत भेट झाल्यानंतर ऋषी सुनक यांच्या पंतप्रधान पदावर शाही शिक्कामोर्तब झाले. येत्या 28 ऑक्टोबर रोजी ते पंतप्रधान पदाची सूत्रे स्वीकारतील. ऋषी सुनक धर्माने हिंदु असले तरी ते भारतीय नाहीत. ते अंतर्बाह्य ब्रिटिश आहेत. त्यांचे आईवडील भारतीय असून ऋषी सुनक यांचे संगोपन व शिक्षण इंग्लंड व युरोपमध्येच झाले आहे. इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती आणि प्रख्यात चिंतनशील लेखिका डॉ. सुधा मूर्ती यांचे ते जावई आहेत. ब्रिटिश अर्थव्यवस्था सध्या अतिशय अवघड परिस्थितीतून जात आहे. युरोपीय समुहातून वेगळे होण्याचा निर्णय घेतल्यानंतर ब्रिटनमध्ये आर्थिक अस्थैर्याचा कालखंड सुरू झाला. त्यात विविध कारणांनी परिस्थिती आणखी बिघडत गेली. कोरोना काळात जगातील सार्याच देशांच्या अर्थव्यवस्थेचे कंबरडे मोडले होते, त्याला ब्रिटनदेखील अपवाद नव्हता. ब्रिटनचे तत्कालीन पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना पायउतार व्हावे लागल्यानंतर सत्ताधारी हुजुर पक्षात लिझ ट्रस यांनी ऋषी सुनक यांची घोडदौड काहिशी रोखली आणि त्या स्वत:च ब्रिटनच्या पंतप्रधान झाल्या, परंतु त्यांची कारकीर्द अवघ्या 44 दिवसांची ठरली. कर आकारणीच्या प्रश्नावरून त्यांचे पाठबळ घटले व त्यांनादेखील पायउतार व्हावे लागले. सत्ताधारी हुजुर पक्षात पंतप्रधान पदासाठी पेनी मॉरडॉन्ट आणि ऋषी सुनक यांच्यात सुरस झाली. हुजुर पक्षाच्या 357 खासदारांपैकी सुनक यांना 142 जणांनी पाठिंबा दिला. तर मॉरडॉन्ट यांच्याकडे अवघे 29 सदस्यांचे पाठबळ होते. नेतेपदी निवड होण्यासाठी आवश्यक असलेला किमान शंभर खासदारांचा पाठिंबा मिळणे शक्य नाही, असे लक्षात आल्यानंतर मॉरडॉन्ट यांनी माघार घेतली आणि हुजुर पक्षाचे नवे नेते म्हणून सुनक यांची बिनविरोध निवड झाली. ब्रिटनने गेल्या सहा वर्षांत प्रचंड राजकीय अस्थिरता अनुभवली आहे. आधुनिक लोकशाहीचे पाळणाघर समजल्या जाणार्या या देशाने गेल्या सहा वर्षांत चार पंतप्रधान पाहिले आहेत. ब्रेग्झिट प्रकरणात अपयशी ठरल्याने थेरेसा मे यांनी तीन वर्षे बारा दिवस कारभार करून अखेर राजीनामा दिला होता. त्यानंतर आलेल्या बोरिस जॉन्सन यांनादेखील आपला कार्यकाळ पुरा करता आला नाही. लिझ ट्रस यांची कारकीर्द अल्पजीवीच ठरली. आता पंतप्रधान सुनक यांना ब्रिटनमधील डबघाईला आलेल्या अर्थव्यवस्थेला सावरावे लागणार आहे. महागाई आणि वाढते व्याजदर यामुळे तेथील परिस्थिती स्फोटक बनली आहे. युक्रेन युद्धामुळे वीजदेयकाच्या समस्या अधिकच उग्र बनल्या आहेत. चलनबाजारात पाऊंड स्टर्लिंगची अवस्था नाजुक झाली आहे. अशा अवघड परिस्थितीत ब्रिटनची आंतरराष्ट्रीय आर्थिक विश्वासार्हता पुन्हा प्रस्थापित करण्याचे कठीण आव्हान पंतप्रधान सुनक यांच्या समोर आहे.
Check Also
कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये
पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …