Breaking News

दिवाळी सणात आत्मीयता राहिली नाही!

दिवाळी म्हणजे दिव्यांचा, प्रकाशाचा, आनंदाचा सण. मुलांना फटाके फोडायचे असतात, किल्ला बनवायचा असतो मजा करायची असते. दिवाळीची सुटी असल्याने अनेकांचे फिरण्याचे बेत ठरलेले असतात. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत पर्यटनाचे काहींनी बेत केलेले असतात तर कोणाला मामाच्या गावाला जायचे असते. त्यामुळे लहानापासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच हवासा वाटणारा सण दिवाळी, पण आज त्यात आत्मीयता जाणवतच नाही. वसुबारसपासून खरेतर दिवाळीला सरुवात होते. या दिवसापासून गृहिणी आपल्या दारात पणत्या लावायला सुरुवात करतात. गाय आणि वासराची पुजा करण्याची प्रथा काही भागात आहे. गाईला बाजारी व गूळ खाऊ घालतात. मुला बाळांना आरोग्य व सुख लाभावे म्हणून हा दिवस साजरा करतात. धनोत्रयोदशीला सायंकाळी घरातीला महिला अभ्यंग स्नान करतात. आपल्या घरातील देवासमोर घरातील धन ठेऊन त्याची पूजा करतात. धणे व गुळाचा नैवेद्य दाखवतात. घरी आकाश कंदील व पणत्या लावतात. नरकचतुर्दशीला पहाटे लवकर उठून अंगाला सुगंधी तेल व सुगंधी उटणे लावून अभ्यंग स्नान करतात. हा दिवाळीचा मुख्य दिवस समजला जातो. या दिवशी नरकासूराचा वध करण्यात आला त्याचे प्रतीक म्हणून डाव्या पायाच्या अंगठ्याने चिराटी पायाने फोडण्याची प्रथा आहे. चिराटे सर्व अंगाला लावून मग आंघोळ करतात. यामागे चिराटे हे कडवट चवीचे असले तरी त्याच्या औषधी गुणधर्मामुळे अंगावर खरूज किवा इतर त्वचा रोग होऊ नये हा मूळ उद्देश असायचा. अभ्यंग स्नान झाल्यावर दिवा उतरण्यात येतो, मग देवाची पुजा करून घरातील देवाला फराळाचा नैवद्य दाखवून घरातील सर्वजण एकत्र फराळ करतात. लहान मुले व मोठी माणसे ही नवीन कपडे घालून फराळ घेऊन मित्रांबरोबर फिरायला जातात, फटाके फोडतात. आश्विन अमावस्या या दिवशी लक्ष्मीपूजन  करतात. हा दिवस व्यापार्‍यांचा महत्त्वाचा दिवस असतो. या दिवसापासून त्यांचे नवीन हिशेब सुरू होत असतात. काही व्यापारी चोपडा पूजन करतात तर काही लक्ष्मी पूजन करतात पुजा झाली की व्यापारी मंडळी एकमेकांना भेटून शुभेच्छा देतात, मिठाई वाटतात.  कार्तिक शुध्द प्रतिपदा म्हणजेच पाडवा साडेतीन मुहूर्ता पैकी एक मुहूर्त समजला जातो. सूर्योदयापूर्वी सर्व खोल्यातील केर काढून  त्यावर पणती व पैसे ठेऊन तो कचरा घराचे बाहेर ठेवतात. या दिवशी पत्नी पतीला ओवाळते पती तिला भेट वस्तु देतो. कार्तिक शुध्द द्वितीया यमबीज म्हणजेच भाऊबीज म्हणजे बहिणीने भावाला ओवाळायचा सण. भाऊ बहिणीला दिवा ओवाळल्यावर भेट वस्तु देतो. बहीण भावाला वाण देते. यामध्ये फळे, सुकामेवा, मिठाई व पैशाचे नाणे असते. यादिवशी भाऊ येणार म्हणून जेवणाचा खास बेत केला जातो. बहीण आपल्या माहेराहुन येणार्‍या भाऊरायाची वाट पाहत असते. दिवाळीत पहाटे लवकर उठल्यावर थंडीत कुडकुड्त आंघोळ झाली की नवीन कपडे घालायचे आणि मग चार-पाच मित्र मिळून  सायकल वरुन फिरायला जाण्यात वेगळीच मजा असायची. सायकलने 25-30 किमी अंतरावरील किल्ल्यावर  किवा देवळात जायचे. त्यावेळी गावात  दोन -चार मोटरसायकल किंवा स्कूटर असायच्या. त्यामुळे सायकल असणारा मित्र ही श्रीमंत वाटायचा. सायकल नसलेल्या मित्राला डबल सीट घेऊन सोबत नेण्यात कधीच कोणाला कमी पणा वाटायचा नाही. एखाद्या नदी किनारी किवा तलावाजवळ झाडाखाली बसून सोबत आणलेला फराळ एकत्र बसून खाण्यात मजा यायची. आज फराळाचे फोटो मोबाइलवरून पाठवण्याचा जमाना आहे. त्यामुळे ती मजा आजच्या पिढीला अनुभवता येत नाही. कोरोनानंतर प्रथमच यावर्षी खुल्या वातावरणात सण साजरे करायला मिळत आहेत. पूर्वी दिवाळीत थंडी असायची. पण यावर्षी अनेक भागात पाऊसच होता. पूर्वी दिवाळी सण साजरा करताना एक आत्मीयता होती. त्यावेळी एकमेकांना भेटून शुभेच्छा देण्यात आपुलकी होती. प्रत्येक गृहिणीला आपण बनवलेला फराळ देण्यात आनंद वाटायचा. घरातील तरुण मुली दारा समोर सुंदर रांगोळी काढायच्या त्याची दिवसभर तयारी सुरू असायची. आज तरूण पिढी मोबाइलवरून व्हॉट्सअ‍ॅपवर मेसेज पाठवण्यात धन्यता मानते. बाजारातला तयार फराळ आणला जातो. प्लॅस्टिकच्या तयार रांगोळ्या दारा समोर मांडल्या जातात. फराळा ऐवजी मिठाईचे बॉक्स देण्याला महत्व आले. आपला मोठेपणा दाखवण्याची संधी म्हणून मोठमोठया वस्तु भेट देण्याची प्रथा पडली आहे. दिवाळी पहाट सारखे कार्यक्रम पाहण्यात वेळ जात असल्याने फिरणे व एकत्र बसून गप्पा मारीत फराळ करण्याची मजा राहिली नाही हेच खरे…

-नितीन देशमुख

Check Also

सर्वांनी शिवरायांचे विचार जगायला हवेत -लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तछत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती गव्हाण यांच्यातर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती …

Leave a Reply