Breaking News

मोटरसायकल, रिक्षा, लॅपटॉप व मोबाइल चोरणारी मुले ताब्यात

लाखोंचा मुद्देमाल जप्त

पनवेल : वार्ताहर

पनवेल परिसरात गेल्या काही दिवसापासून रिक्षा, लॅपटॉप तसेच मोबाइल चोरीच्या घटना वाढल्या होत्या. या संदर्भात पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अजयकुमार लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने तीन विधीसंघर्षग्रस्त बालकांना (विशिष्ट परिस्थितीत गुन्ह्याचे कृत्य करणारी मुले) ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून आतापर्यंत तीन लाख आठ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

पनवेल शहर पोलीस ठाणे हददीतील बालाजी आटे मोबाइल समोर, नंदनवन सोसायटी पनवेल येथ पार्क करुन ठेवलेली सुझुकी एक्सेस मोटरसायकल (एमएच 46 क्यु 6920) ही कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरी करुन नेल्याची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली होती, तसेच गेल्या काही दिवसांपासून  वाहनचोरीचे गुन्ह्यांचे प्रमाण वाढल्याने पोलीस आयुक्त बीपीन कुमार सिंह, पोलीस सहआयुक्त डॉ. जय जाधव, पोलीस उप आयुक्त शिवराज पाटील व सहाय्यक पोलीस आयुक्त, नितीन भोसले-पाटील यांनी विशेष प्रयत्न करून हे गुन्हे उघडकीस आणण्याबाबतच्या सुचना वरिष्ठ निरीक्षक अजयकुमार लांडगे यांना दिल्या होत्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक गुन्हे संजय जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथक पनवेल परिसरात शोध घेत होते. या वेळी सीसीटीव्ही फुटेज व गुप्त बातमीदारांच्या आधारे गुन्हयातील तीन विधीसंघर्षग्रस्त बालकांना कळंबोलीतील रोडपाली येथुन ताब्यात घेऊन त्यांच्याकडुन वरील गुन्ह्यातील मोटरसायकल व इतर गुन्ह्यातील मुद्देमाल हस्तगस्त करण्यात आला आहे.

त्यांच्याकडुन पनवेल शहर, खारघर व सानपाडा पोलीस स्टेशनचे गुन्हे उघडकीस आले आहेत. त्यांच्याकडून पाच मोटरसायकल, ऑटो रिक्षा, तीन मोबाइल फोन, एक लॅपटॉप, 12 मोटरसायकलच्या चाव्या, एक बॅग असा एकूण तीन लाख आठ हजारांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. या आरोपींना तीन विधीसंघर्षग्रस्त बालकांना गुरुवारी (दि. 13) मा. बाल न्याय मंडळ, कर्जत यांचेसमक्ष हजर करून बाल निरीक्षण गृह कर्जत येथे रवाना केले आहे.

मौजमजेसाठी चोर्‍या

गुन्ह्यातील विधीसंघर्ष बालक हे एकमेकांचे मित्र आहेत. त्यांना बेवारस सापडलेल्या मोटरसायकलच्या चाव्या गोळा करून जवळ ठेवतात. रात्रीच्या वेळेस फिरून ज्या मोटरसायकलला चावी लागेल ती मोटरसायकल चोरी करतात. चोरी केलेल्या मोटरसायकलचे पेट्रोल संपल्यानंतर बेवारस सोडुन देतात, तसेच रहिवाशी सोसायट्यांमधील वॉचमन झोपल्यानंतर चार्जिंगला लावलेले मोबाइल फोन चोरी करतात, असे तपासात निष्पन्न झाले आहे.

तळोजातून मोटरसायकलची चोरी

पनवेल : पनवेल जवळील मुंब्रा रोडवर तळोजा ब्रीज लगत उभी करून ठेवलेली एक मोटरसायकल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली आहे. नितीन बळीराम कोळी (वय 44, रा.कोळीवाडा) यांनी त्यांची 40 हजार रुपये किमतीची सीबी हॉर्नेट 160 आर होंडा कंपनीची मोटरसायकल (एमएच-46-एवाय-9366) ही तळोजा ब्रीज रोडलगत उभी करून ठेवली होती. या वेळी अज्ञात चोरट्यांनी ही मोटरसायकल चोरून नेल्याने याबाबतची तक्रार तळोजा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

Check Also

कामोठ्यात शनिवारी ’मा. श्री. परेश ठाकूर केसरी’ भव्य कुस्त्यांचे जंगी सामने

पैलवान देवा थापा आणि नवीन चौहान यांची बिग शो मॅच होणार पनवेल ः रामप्रहर वृत्त …

Leave a Reply