उडणार्या धुळीने लोक हैराण
खोपोली : प्रतिनिधी
खालापूर तालुक्यातील चिंचवली- मानकीवली रस्त्यावरील दगडखाणींतील सुरूंग स्फोटांमुळे चिंचवली येथील घरांना हादरे बसतात, त्यास शासनाने प्रतिबंध घालावा, तसेच गावाजवळून जाणार्या ट्रकमुळे उडणार्या धुळीने चिंचवली ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे, या पार्श्वभूमीवर चिंचवली (शेकिंन) ग्रामस्थांनी शुक्रवारी (दि. 2) दगडखाणींचे ट्रक रोखून आंदोलन केले.
चिंचवली मार्गे माणकवली-कर्जत रस्ता आहे, या रस्त्यावर अनेक दगडखाणी आहेत. या खाणीत दररोज सुरूंगस्फोट घडवून आणले जातात. त्यामुळे चिंचवलीतील घरांना हादरे बसतात. त्याबाबत खालापूर तहसीलदारांना निवेदन देण्यात आले होते. तसेच त्याचा सातत्याने पाठपुरावाही केला. मात्र संबंधीत कार्यालय त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
दगडखाणीतील सुरूंगस्फोटाच्या हादर्याने गावातील गणेश मंदिराजवळील घराचे स्लॅब कोसळल्याची माहिती ग्रामस्थ व सामाजिक कार्यकर्ते रवींद्र रोकडे यांनी दिली. खडी व डबर भरलेले ट्रक जाताना उडणार्या धुळीमुळे रस्त्यालगतच्या ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे, त्यामुळे हे ट्रक मानकीवलीमार्गे नेण्यात यावे, अशी रोकडे यांची मागणी आहे.