Breaking News

महिन्याभरात कांदा रडवणार

एपीएमसीत प्रतिकिलो 35 रुपयांवर

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त

दोन आठवड्यापासून एपीएमसी बाजारात कांद्याच्या दरात सातत्याने वाढ पहावयास मिळत आहे. मागील आठवड्यात गुरुवारी आणि त्यानंतर शनिवारी कांद्याच्या दरात किमान पाच ते सहा रुपयांची वाढ झाली आहे. तर आता सोमवारी (दि. 31) बाजारात उच्चतम प्रतीचा कांदा प्रति किलो 35 रुपयांवर पोहोचला आहे. त्यामुळे गेल्या पाच दिवसांत 10 ते 12 रुपयांनी वाढ झाली असून, महिन्याभरात कांद्याचे दर गगनाला भिडणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. वाशीतील कृषी उत्पन्न कांदा बटाटा बाजारात मागील आठवड्यापासून कांद्याची दरवाढ सुरू झाली आहे. मागील एक- दोन महिन्यांत राज्यात परतीचा पाऊस मोठया प्रमाणात झाला. त्यामुळे साठवणूकीचा जुना कांदा मोठ्या प्रमाणावर खराब होत आहे,तर नवीन लाल कांद्याच्या हंगामालाही फटका बसला आहे. त्यामुळे बाजारात उच्चतम प्रतिचा कांदा कमी प्रमाणात दाखल होत असून हलक्या प्रतीचा कांदा अधिक आहे, मात्र घाऊक बाजारात सर्वात उच्चतम प्रतीच्या कांद्याला अधिक मागणी आहे. कांद्याचा पुरवठा कमी असल्याने एक नंबरवर असलेल्या कांद्याची दरवाढ होत आहे. उच्चतम प्रतीचा कांदा 20 टक्के तर हलक्या प्रतीचा कांदा 80 टक्के दाखल होत आहे. एक नंबर असलेल्या कांद्याला सोमवारी बाजारात 25 ते 35 रुपये दराने विक्री झाली, तर हलक्या प्रतीच्या कांद्याला 20 ते 25 रुपयांनी विक्री झाली. सोमवारी बाजारात कांद्याच्या दीडशे गाडी दाखल होऊ देखील दरात 5 रुपयांची वाढ झालेली आहे. मागील आठवड्यात गुरुवारपर्यंत कांदा 25 रुपयांवर होता, मात्र त्यानंतर कांद्याच्या दरवाढीला सुरुवात झाली. गुरुवारी बाजारात कांदा 25 ते 27 रुपये तर शनिवारी 25 ते 31 रुपये किलो दराने विक्री विक्री झाला मात्र सोमवारी पुन्हा बाजार उघडताच कांद्याने 35 गाठली आहे. महिन्याभरात कांदा चाळिशीपार करणार असल्याचे भाकीत वर्तविण्यात येत असून किरकोळ बाजारातही पन्नाशी गाठणार असल्याची चर्चा सुरू आहे.

 बटाट्याच्या दरातही वाढ

यंदा कांद्याच्या तुलनेत बटाटा वरचढ ठरत होता. परंतु गेल्या काही दिवसांपासून बटाट्या पेक्षाही कांद्याच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. गेल्या महिन्याभरापासून स्थिर असलेल्या बटाट्याचे दर या आठवड्यात वाढण्यास सुरुवात झाली आहे. सध्या बाजारात जुना बटाटा मोठ्या प्रमाणावर असून एक ते दोन गाड्या नवीन बटाटा आवक होत आहे. सध्या बाजारात सातारा आणि तळेगाव येथून नवीन बटाट्याची आवक होत आहे. या नवीन बटाट्याला अधिक मागणी असल्याने 25 रुपये अधिक दराने विकला जात आहे, ची माहिती घावक व्यापारी मनोहर तोतलानी यांनी दिली. तर दुसरीकडे जुना बटाटा चवीला गोड लागत असल्याने त्याची मागणी दिवसेंदिवस रोडावत आहे. त्यामुळे बाजारात चांगल्या बटाट्याची मागणी वाढल्याने दर वाढत आहे. एक आठवड्यापूर्वी 18 ते 22 रुपयावरून आता 20 ते 25 रुपयांवर पोचला आहे.

Check Also

कामोठ्यात शनिवारी ’मा. श्री. परेश ठाकूर केसरी’ भव्य कुस्त्यांचे जंगी सामने

पैलवान देवा थापा आणि नवीन चौहान यांची बिग शो मॅच होणार पनवेल ः रामप्रहर वृत्त …

Leave a Reply