Breaking News

नवी मुंबईत 29 कोटींचे खाद्यपदार्थ जप्त

अन्न व औषध प्रशासनाची कारवाई

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त

विविध देशांतून आयात केलेल्या खाद्यपदार्थाचा दर्जा अन्न व सुरक्षा मानकांप्रमाणे न आढळल्याने अन्न व औषध प्रशासनाने नवी मुंबईतील शीतगृहांवर कारवाई करून 29 कोटींचा माल जप्त केला आहे. आतापर्यंतही ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त अभिमन्यू काळे यांनी सांगितले.

सध्या परदेशांतून आयात केलेले खाद्यपदार्थ वापरण्याचे प्रमाण वाढले आहे, मात्र हे खाद्यपदार्थ आयात केल्यानंतर ते ज्या शीतगृहात ठेवले जातात तेथे काळजी घेत नसल्यामुळे दर्जाबाबतच्या तक्रारी अन्न व औषध प्रशासनमंत्री संजय राठोड यांच्याकडे आल्या होत्या. या तक्रारींची शहानिशा केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. तुर्भे येथील मे. सावला फूडस् अ‍ॅण्ड कोल्ड स्टोरेजवर अन्न व सुरक्षा विभागाच्या अधिकार्‍यांनी अचानक धाड टाकली. त्या वेळी या धाडीत अनेक आक्षेपार्ह बाबी आढळून आल्या. आयात केलेल्या खाद्यपदार्थाच्या दर्जाबद्दलच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तूर्तास 35 नमुने चाचणीसाठी ताब्यात घेण्यात आले आहेत, असे राठोड यांनी सांगितले.

परदेशातून येणार्‍या खाद्यपदार्थाचा दर्जा राखला जावा, यासाठी आता राज्यभरात ही मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या शीतगृहात उंदीर, झुरळांचे साम्राज्य होते. याशिवाय आयात केलेल्या खाद्यपदार्थावर मूळ देशाच्या नावाचाही उल्लेख नव्हता. संबंधित खाद्यपदार्थ कधी पाठविण्यात आले तसेच या खाद्यपदार्थ वापरण्याची अंतिम मुदत काय आहे आदी अन्न व सुरक्षा मानकांनुसार काळजीही घेतली गेली नसल्याचे आढळून आले. अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 नुसार परवाने घेतले नसल्याची गंभीर बाब आढळून आली आहे. याबाबत आवश्यक ती पूर्तता करण्यास शीतगृहांना सांगण्यात येणार असून त्यांच्यावर

दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. तपासणीसाठी घेतलेल्या नमुन्यात संबंधित खाद्यपदार्थ जीवितास घातक आढळून आल्यास संबंधितांविरुद्ध थेट न्यायालयात खटला दाखल केला जाणार आहे. आयातदार व  शीतगृह मालक यांच्यामध्ये करारनामा झालेला नसतानाही बेकायदेशीररीत्या खाद्यपदार्थाचा साठा करण्यात आल्याची आणखी एक गंभीर बाब या धाडीत उघड झाल्याचे काळे यांनी सांगितले.

सहआयुक्त (अन्न) शशिकांत केंकरे, सहायक आयुक्त अनुपमा पाटील, प्रियांका विशे, आर. डी. पवार, मारोती घोसलवाड तसेच अन्न सुरक्षा अधिकार्‍यांच्या पथकाने ही कारवाई केली.

कामगारांसाठी असलेल्या स्वच्छतागृहाजवळही काही प्रमाणात खाद्यपदार्थाचा साठा करण्यात आला होता. काही खाद्यपदार्थाचा दर्जा निकृष्ट असल्याचेही आढळून आले. खाद्यपदार्थाच्या वेष्टनावर हा तपशील नसल्याचे या गोदामातून माल जेव्हा इतर दुकानांना जाईल तेव्हा त्यांच्याकडे पुन्हा नवे वेष्टन घातले जाईल. मात्र त्यावरही संबंधित खाद्यपदार्थ वापरण्याची मुदत नमूद करण्यात आलेली नसल्याचेही आढळून आले, ही गंभीर बाब आहे. -अभिमन्यू काळे, आयुक्त, अन्न व औषध प्रशासन

Check Also

केंद्र सरकार पाच वर्ष टिकेल -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत ः प्रतिनिधी मला या निवडणुकीत खूप काही शिकता आले. विरोधकांनी जाती जातीत तेढ निर्माण …

Leave a Reply