नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा
नवी मुंबईतील तळोजा नोडमधील सेक्टर-28, 29, 31 व 37 मध्ये साकारण्यात येत असलेल्या महागृहनिर्माण योजनेतील इमारतींमधील 500 स्लॅबचे काम 489 दिवसांत पूर्ण केल्यानंतर, सिडको महामंडळाने पुन्हा एकदा सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांच्या मार्गदर्शनाखाली याच इमारतींमधील 700 स्लॅबचे काम केवळ 555 दिवसांत पूर्ण करून
गृहनिर्माण क्षेत्रातील आपल्याच यशाची पुनरावृत्ती केली आहे.
सिडकोतर्फे नवी मुंबईतील विविध नोडमध्ये 67,000 घरांच्या (सदनिका) बांधणीचे उद्दिष्ट आहे. हे उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या दिशेने सिडकोची वेगाने वाटचाल सुरू आहे. परिहवन केंद्रित विकास संकल्पनेवर आधारित या गृहनिर्माण योजनेतील घरांचे बांधकाम रेल्वे स्थानक फोरकोर्ट, बस व ट्रक टर्मिनल परिसरात करण्यात येत आहे. यामुळे प्रवासाच्या वेळेत बचत होण्यासह सार्वजनिक वाहतुकीच्या वापरासही प्रोत्साहन मिळणार आहे.
महागृहनिर्माण योजने अंतर्गत तळोजा नोडमधील सेक्टर-28,29,31 व 37 मध्ये विकसित करण्यात येत असलेल्या इमारतींमधील 700 स्लॅबचे काम केवळ 555 दिवसांत पूर्ण करण्यात आले आहे. दिवसाला सरासरी 1.26 स्लॅब या विक्रमी वेगाने हे काम पूर्ण करण्यात आले. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून, गुणवत्तेशी कोणतीही तडजोड न करता सिडकोने ही कामगिरी पार पाडली आहे. सिडकोतील नियोजनकार व अभियंते, प्रकल्प सल्लागार टीसीई-एचएसए, एएचसी, कंत्राटदार बीजीएस अॅन्ड कं. यांनी डॉ. संजय मुखर्जी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कामगिरी पार पाडली आहे.
या कामगिरीद्वारे सिडकोने गृहनिर्माणातील आपल्या यशाची पुनरावृत्ती केली आहे. सिडकोचे हे यश परवडणार्या दरातील घरांच्या क्षेत्रातील एक सकारात्मक घडामोड आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या परवडणार्या दरातील घरांचे स्वप्न कमी कालावधीत पूर्ण करण्याच्या दिशेने पडलेले हे आशादायी पाऊल आहे.
परवडणार्या दरातील घरांचे बांधकाम नियोजित कालावधीत पूर्ण करण्याचे सिडकोचे उद्दिष्ट आहे. यासाठी गुणवत्तेशी कोणतेही तडजोड न करता, घरांचे बांधकाम वेगाने पार पाडण्याकरिता बांधकाम क्षेत्रातील प्रगत आणि अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर सिडकोचा भर आहे. -डॉ. संजय मुखर्जी, एमडी, सिडको