पनवेल ः प्रतिनिधी
पनवेल रेल्वेस्टेशनवर नवीन पनवेल बाजूला प्रवाशांसाठी वन रूपी क्लिनिक नुकतेच सुरू करण्यात आले आहे. विषारी सापांचाही तेथे संचार सुरू असल्याने तेथील डॉक्टर, परिचारिका आणि येणार्या रुग्णांच्यात भीतीचे वातावरण आहे. जागा चुकीची निवडल्याने या ठिकाणी येणार्या रुग्णांची संख्या कमी असल्याची माहिती तेथील डॉक्टरांनी दिली.
पनवेल रेल्वेस्टेशनवर रोज लाखो प्रवासी येत असतात. अनेक वेळा अपघात होतात किंवा एखाद्या प्रवाशाची तब्येत प्रवासा दरम्यान बिघडल्यास त्याला वैद्यकीय मदत मिळण्यासाठी या स्टेशनवरील फलाटावर प्रवाशांसाठी दवाखाना सुरू करण्याची मागणी रेल्वे सल्लागार समितीने केली होती. आमदार प्रशांत ठाकूर यांनी रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांना त्यासाठी पत्र दिले होते. या दवाखान्याची जागा निश्चित करताना सल्लागार समितीला विश्वासात न घेता नवीन पनवेल बाजूला एका कोपर्यात दवाखाना आणि मेडिकल स्टोअर सुरू करण्यात आले. मॅजिक डील ही संस्था वन रूपी क्लिनिक या ठिकाणी चालवीत असून त्या ठिकाणी डॉक्टर 24 तास उपलब्ध असतात. येथे तपासणी फी एक रुपया असून कमीत कमी दरात इसीजी, रक्त तपासणी, ड्रेसिंग, रक्तदाब तपासणी, युरिन, सलाईनसारख्या अनेक तपासण्या कमी दरात करून मिळण्याची सोय आहे.