Breaking News

रायगड जिल्ह्यातील आर्यन पाटीलला उंच उडीत ‘सुवर्ण’

माणगाव : प्रतिनिधी
आसाममधील गुवाहाटी येथे झालेल्या 37व्या नॅशनल ज्युनिअर अ‍ॅथलेटिक चॅम्पियनशीपमध्ये उंंच उडी खेळात रायगड जिल्ह्यातील आर्यन अरुण पाटीलने सुवर्णपदक पटकाविले. यापूर्वी खेलो इंडिया स्पर्धेत आर्यनने रौप्यपदक जिंकले होते. आर्यनला केंद्र शासनातर्फे पाच लाख आणि राज्य शासनाकडून दोन लाख रुपयांची शिष्यवृत्ती प्राप्त झाली आहे.
आर्यन पाटीलचे वडील अरुण पाटील हे माणगाव येथील वनवासी कल्याण आश्रमशाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असून आईदेखील शिक्षिका आहे. आर्यनचे मूळगाव रावे (ता. पेण) आहे. तो शालेय वयापासून उंच उडी खेळात त्याच्या एस. एस. निकम शाळेचे प्रतिनिधित्व करीत होता. तालुका, जिल्हा व राज्यस्तरावर त्याने चांगली कामगिरी केली आहे.
ओडिशामधील स्पर्धेत आर्यन पाटीलने सुवर्णपदक जिंकून फ्रान्स या देशात आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे. आर्यन पाटील सध्या रसायनीतील पिल्लई कॉलेजमध्ये एफवायबीएस्सीत शिकत आहे. मुंबईतील साई अकॅडमीच्या माध्यमातून तो खेळत असून त्याला प्रशिक्षक इंझमाम-उल-हल यांचे प्रशिक्षण लाभत आहे.
आर्यनने राज्य तसेच राष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभाग घेत सुवर्ण, रौप्य व कांस्यपदके प्राप्त केली आहेत. नॅशनल ज्युनिअर अ‍ॅथलेटिक चॅम्पियनशीपमध्ये सुवर्ण पदक प्राप्त केल्याबद्दल वनवासी कल्याण आश्रमशाळा माणगाव समितीचे अध्यक्ष महादेव जाधव, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, पिल्लई कॉलेजच्या प्राचार्य, संचालक, प्राध्यापक तसेच क्रीडा क्षेत्रातून त्याचे अभिनंदन होत आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply