पनवेल : बातमीदार
गुटखा व तंबाखुजन्य पदार्थ बाळगणार्या व्यक्तीवर कारवाई न करण्यासाठी लाच घेतल्याप्रकरणी नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कोपरखैरणे पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षकासह अमली पदार्थविरोधी पथकातील पोलीस नाईक व एक खासगी व्यक्ती अशा तिघांना अटक केली आहे. या प्रकरणात सहभागी असलेला पोलीस शिपाई कारवाईनंतर फरार झाला असून, त्याचा शोध सुरू आहे.
नवी मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थविरोधी पथकाने ठाणे येथील अन्न व औषध प्रशासनाच्या मदतीने घणसोली सेक्टर 4 भागातील रो-हाऊसवर छापा मारून तीन लाख 32 हजार रुपये किमतीचा गुटखा व तंबाखुजन्य पदार्थांचा साठा जप्त केला होता. तपासादरम्यान गुटख्याचा साठा बाळगणार्या व्यक्तीविरोधात कारवाई न करण्यासाठी त्याच्याकडे कोपरखैरणे पोलीस ठाण्यातील परिविक्षाधीन उपनिरीक्षक सचिन गिड्डे व शिपाई शिरीष चव्हाण यांनी 50 हजार रुपये लाचेची मागणी केली तडजोडीअंती 30 हजार रुपये देण्याचे कबूल करून या व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नवी मुंबई युनिटकडे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर उपनिरीक्षक गिड्डे व शिपाई चव्हाण या दोघांनी प्रमोद उर्फ काळू बळभद्र दास या खासगी व्यक्तीमार्फत 20 हजार लाचेची रक्कम अंमली पदार्थ विरोधी पथकातील पोलीस नाईक सूर्यभान पाटील याला देण्यास सांगितले होते. ठाणे-बेलापूर मार्गावरील रिलायन्स कंपनीसमोर सापळा लावून पाटील याला पकडण्यात आले. तपासात उपनिरीक्षक गिड्डे, शिपाई चव्हाण व खासगी व्यक्ती प्रमोद दास यांनी लाचेची मागणी केल्याचे आढळून आले. त्यामुळे पथकाने या दोघांना अटक केली, तर शिपाई फरार झाला आहे.