पनवेल ः वार्ताहर
द मॅन्युफॅक्चर स्टोरेज अँड इंपोर्ट ऑफ हझार्डस केमिकल रुल्सच्या नियम 14मधील तरतुदीन्वये कारखान्यांमध्ये प्रतिवर्षी बाह्य आपत्कालीन आराखड्याची सराव चाचणी घेणे बंधनकारक आहे. या तरतुदीअंतर्गत गणेश बेंझोप्लास्ट लिमिटेड, बल्क टर्मिनल, जेएनपीटी या ठिकाणी बाह्य आपत्कालीन आराखड्याची पूर्वनियोजित कवायत घेण्यात आली. कारखान्यातील टँक 104शी निगडित असलेल्या पंप 104च्या सक्शन लाईनमधून रसायनाची गळती झाल्यामुळे सदर पंपाचे फ्लांज टाईट करताना नटबोल्ट जमिनीवर पडल्याने आग लागून त्या ठिकाणी एक कामगार अडकल्याची रूपरेषा कवायतीच्या वेळी नियोजित करण्यात आली होती. अशा प्रकारच्या कवायती आयोजित करण्यामागे आपत्कालीन परिस्थितीत कारखान्यातील कामगारांची असलेली पूर्वतयारी व आग विझवतेवेळी कारखान्यात असलेली उपकरणे सुरक्षित व कार्यान्वित असल्याबाबत तसेच शासकीय संस्थांचा प्रतिसाद कालावधी पाहणे हा प्रमुख उद्देश असून अशावेळी कारखान्यातील अधिकारी व कर्मचार्यांना प्री ब्रीफिंग तसेच पोस्ट ब्रीफिंग करण्यात येते. प्रत्यक्ष कवायतीच्या वेळी, जेएनपीटी फायर सर्विस, पोलीस, मेडिकल सर्विस, मार्ग ग्रुप, चे सर्व मेंबर्स यांनी तातडीने प्रतिसाद दिला. सदर मॉक ड्रिल चे सर्वत्र कौतुक होत असून गणेश बेंझोप्लास्ट या कंपनीने आयोजित करण्यात आलेल्या कवायती मधून आपत्कालीन परिस्थिती कशा प्रकारे हाताळण्यात यावी या विषयाची चांगल्या प्रकारे माहिती मिळाली असल्याचे मत दीपक फर्टीलायझर, अलाना, रिलायन्स, आय.ओ.सी.एल, सुरज ऍग्रो, तसेच आयएमसी, सारख्या शेजारील कंपनीने प्रदर्शित केले तर अग्निशमन सेवेसारख्या अत्यावश्यक सेवेचा प्रतिसाद कालावधी कमीत कमी करण्याकरता रस्त्यावर उभे असलेल्या रासायनिक टँकरची वाहतूक योग्यरित्या नियोजित करणे आवश्यक असल्याची सूचना जेएनपीटीचे अग्निशमन अधिकारी कर्णिक यांनी केली. सदर कवायत औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय तसेच तहसीलदार यांच्या सल्ल्यानुसार व कंपनीचे श्याम निहाते, आशुतोष पाटील, सचिन सस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली असून यामध्ये साजिद अहमद टर्मिनल प्रबंधक आय.ओ.सी.एल यांनी परीक्षक म्हणून काम केले.