Breaking News

गायरान जमिनीसंदर्भात ग्रामस्थांना न्याय मिळवून देणार -आमदार महेश बालदी

पनवेल : रामप्रहर वृत्त
गायरान जमिनीसंदर्भात ग्रामस्थांना आलेल्या नोटीस चुकीच्या, बेकायदेशीर व कायद्याच्या तरतुदीविरुद्ध असून कोणत्याही ठोस पुराव्याशिवाय मोघमपणे नोटिसीचा नमूना (फॉरमॅट) तयार करून व गाळलेले शब्द भरून त्या पाठविलेल्या आहेत. त्यामुळे ग्रामस्थांनी घाबरू नये, असे आवाहन आमदार महेश बालदी यांनी केले आहे. त्याचप्रमाणे या संदर्भात मी आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, असेही त्यांनी नागरिकांना आश्वासित केले आहे.
उरण विधानसभा मतदारसंघातील अनेक गावांमध्ये गायरान जमिनीचे कारण देऊन घरे निष्कासित करण्याच्या नोटीस देण्यात आल्या आहेत. या घरांच्या असेसमेंटसदरी नावाची रितसर नोंद आहे तसेच ग्रामपंचायत कर नियमित भरले जात आहे. गेल्या 20 वर्षांपासून राहत असल्याची घराची नोंद ग्रामपंचायत दप्तरी आहे.
ग्रामपंचायत अधिनियम 1958चे कलम 53 (2) प्रमाणे जर एखाद्या क्षेत्रात अतिक्रमण असल्यास व ते सिद्ध झाल्यास अतिक्रमण झाल्यापासून सहा महिन्यांच्या आत संबंधित अतिक्रमण काढण्याचा अधिकार ग्रामपंचायतीला आहे. जर मुदतीत गायरान अतिक्रमण काढले नाही तर योग्य त्या दिवाणी कोर्टाकडून अतिक्रमण सिद्ध करून घेणे व त्यानंतर पुढील कार्यवाही करणे गरजेचे व आवश्यक आहे. अशी वस्तुस्थिती असताना बेकायदेशीर चुकीच्या नोटीस पाठविण्यात आल्या आहेत. त्यामुळे ग्रामस्थ भयभीत झाले आहेत, मात्र ग्रामस्थांनी घाबरू नये, असे आवाहन आमदार महेश बालदी यांनी करून सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन ग्रामस्थांना दिले आहे. त्याचबरोबर या संदर्भात न्यायालयीन लढाईसाठी आपण सज्ज आहोत, असेही त्यांनी अधोरेखित करीत ग्रामस्थांना मोठा आधार दिला आहे.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply