Breaking News

राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेत ठाण्याच्या ‘फ्लाईंग राणी’ची बाजी

ज्येष्ठ रंगकर्मी जयंत सावरकर यांचा गौरव रंगभूमीचा पुरस्काराने सन्मान

पनवेल ः नितीन देशमुख, हरेश साठे

श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नवव्या अटल करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत फ्लाइंग राणी (कलामंथन-ठाणे) या एकांकिकेने बाजी मारली. मानाचा अटल करंडक आणि एक लाख रुपये बक्षिसाचे ते मानकरी ठरले. स्पर्धेच्या महाअंतिम फेरीचा पारितोषिक वितरण समारंभ रविवारी (दि. 4) पनवेलच्या आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात झाला. या वेळी ज्येष्ठ रंगकर्मी जयंत सावरकर यांना गौरव रंगभूमीचा या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सन्मानचिन्ह, मानपत्र, शाल, श्रीफळ व 50 हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली व अध्यक्षतेखाली झालेल्या या रंगभूमी उत्सवाचा पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात झाला. या समारंभास प्रमुख मान्यवर म्हणून अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखेचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आयुक्त गणेश देशमुख, माजी महापौर डॉ. कविता चौतमोल, माजी सभागृह नेते तथा स्पर्धा प्रमुख परेश ठाकूर, माजी उपमहापौर चारुशीला घरत, सीता पाटील, प्रसिद्ध लेखक, निर्माते व दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे, अभिनेते, निर्माते व दिग्दर्शक विजय गोखले, अभिनेते, लेखक व दिग्दर्शक अभिराम भडकमकर, अभिनेते भरत सावले, स्पर्धेचा ब्रँड अ‍ॅम्बेसिडर सुप्रसिद्ध अभिनेता पृथ्वीक प्रताप, भाजप शहराध्यक्ष जयंत पगडे, माजी नगरसेवक अनिल भगत, माजी नगरसेविका दर्शना भोईर, हेमलता म्हात्रे, रूचिता लोंढे, महिला मोर्चा तालुकाध्यक्ष रत्नप्रभा घरत, प्राथमिक फेरीचे परीक्षक राहुल वैद्य, दीपक पवार, सीकेटी महाविद्यालयाचे प्राचार्य एस. के. पाटील, अ‍ॅड. चेतन जाधव, सांस्कृतिक सेलचे जिल्हाध्यक्ष अभिषेक पटवर्धन, युवा मोर्चाचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, पनवेल शहर अध्यक्ष रोहित जगताप, अभिषेक भोपी, स्पर्धा सचिव व नाट्य परिषद पनवेल शाखा प्रमुख कार्यवाह श्यामनाथ पुंडे, अमोल खेर, गणेश जगताप, चिन्मय समेळ, अक्षया चितळे, संजीव कुलकर्णी, वैभव बुवा, निखिल गोरे, उमेश वाळके, प्रतीकेश मोरे, ओमकार सोष्टे यांच्यासह स्पर्धक व नाट्यरसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्पर्धेचे प्रायोजक ठाकूर इन्फ्राप्रोजेक्ट्स प्रा. लि., तर सहप्रायोजक म्हणून नील ग्रुप यांचे सहकार्य लाभले. या वेळी गौरवमूर्ती ज्येष्ठ रंगकर्मी जयंत सावरकर म्हणाले की, मला बसून बोलण्याचा आग्रह केला जातो, पण मी रंगमंचावर बसून कधीच बोललो नाही. पनवेलमध्ये ’के दिल अभी भरा नही’ या नाटकाच्या तालमी केल्या. त्यामध्ये रीमा लागू, विक्रम गोखले होते. आज ते हयात नसल्याचे सांगताना त्यांना अश्रु आवरले नाहीत. जगरहाटीनुसार प्रत्येकाला जायचेच आहे, पण मी पुनर्जन्म घेईन. तो मला नटाचाच मिळावा आणि ज्या थोर व्यक्तींच्या हातून मोठे कार्य झाले आहे, ज्यांची नावे आजही रंगमंचावर आदराने घेतली जातात त्या मला गुरूस्थानी असलेल्या सुधा करमरकर आणि माझे गुरू दामू केंकरे व इतर ज्येष्ठ व्यक्तींप्रमाणे काही कार्य माझ्या हातून घडावे. निव्वळ पोट भरणारा नट म्हणून मला अस्तित्व नकोय आणि तरच मला नटाच्या जन्माला घाल, अशी माझी त्या नटराजाजवळ प्रार्थना असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी सावरकर यांनी पुरुषोत्तम बेर्डे यांच्या नाटकात काम करण्यासाठी आपण कसा नम्र असण्याचा उत्तम अभिनय केला व अभिराम भडकमकर यांच्या स्नेहमंदिर नाटकात काम केले आणि त्यातील सहकलाकाराचे निधन झाल्याने चांगले नाटक 25व्या प्रयोगानंतर बंद पडल्याची आठवण सांगितली. संभू सांच्या चाळीत हे नाटक दूरदर्शनवर विजय गोखलेंसोबत केले, पण आमची मैत्री झाली ती गिरगावात. तेथे एक गुंड मला मारण्याची धमकी देत असे. त्याला विजय गोखलेंनी दम दिल्यावर तो धमकी द्यायचा कसा बंद झाला याचीही आठवण त्यांनी सांगितली. या स्पर्धेतून मिळालेल्या पृथ्वीक आणि ओंकार दोन कलावंतांचे काम मी सातत्याने दूरदर्शनवर पाहत असतो. त्यातल्या पृथ्वीकला भेटता आल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. व्हाईस प्रोजेक्शन आणि भाषा पोटाफोड्या ’ष’ आणि शेंडीफोड्या ’श’ यातील फरक प्रत्येक नटाला समजला पाहिजे. श्वासोच्छवासावर तुमचे नियंत्रण पाहिजे. त्यासाठी नट हा योगासन करणारा असावा असे डॉ. लागू म्हणायचे. तुम्ही प्राणायाम केलात तर एका दमात वाक्य बोलू शकाल, असा सल्ला त्यांनी तरुण कलाकारांना दिला. स्पर्धेस परीक्षक म्हणून लाभलेले प्रसिद्ध लेखक, निर्माते व दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, एकांकिका हा कला आविष्काराचा साधा, सोपा आणि सहज उपलब्ध असणारा उपाय आहे. या क्षेत्रात येण्यासाठी स्ट्रगल करणार्‍यांना मी आवर्जून सांगतो की, तुम्ही ग्रुप करून एकांकिका करा. लोकांचे तुमच्याकडे लक्ष जाईल असे काम करा, म्हणजे आपोआप तुमची कारकीर्द सुरू होईल. हीच पहिली पायरी असून आम्ही ही याच पायरीवरून पुढे गेलो. आजही ती पायरी तशीच शाबूत आहे. एकांकिकेतून रंगकर्मी म्हणून काम सुरू केलेत की तुमचे लंबी रेस का घोडा म्हणून काम सुरू होईल. तुम्हाला अजमाविण्याची संधी या अटल करंडक स्पर्धेने उपलब्ध करून दिली आहे. या स्पर्धेचे नियम कडक असणे फार गरजेचे आहे. हीच शिस्त तुम्हाला पुढे व्यावसायिक रंगभूमीवर आणि अगदी तुमच्या लग्नापर्यंत उपयोगी पडते. लग्नात भाडे जास्त द्यायला लागू नये यासाठी सगळे कार्यक्रम वेळेत करावे लागतात. ते तुम्हाला इथूनच शिकायला मिळते. ही शिस्त लावण्याचे काम या आयोजकांना जात असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले. या स्पर्धेत विषयांचे वैविध्य बघायला मिळाले. 25 पैकी 20 विषय वेगळे होते. त्याबद्दल बेर्डे यांनी लेखकांचे अभिनंदन केले. या वेळी त्यांनी व्हाईस प्रोजेक्शनकडे लक्ष देण्याचा तसेच ध्वनी संयोजनासाठी एक्स्पर्टचा वापर करण्याचा सल्ला दिला. तीन दिवस या स्पर्धेची महाअंतिम फेरी तन्मयतेने पहायला लावण्याचे काम अटल करंडक स्पर्धेचे सुंदर नियोजन करून आयोजकांनी केले. आम्हाला एकदाही 25 एकांकिका कशा पहायच्या असे एकदाही वाटले नाही, कारण सुंदर आयोजन आणि तितक्याच सुंदर एकांकिका होत्या, असे त्यांनी सांगितले. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखेचे उपाध्यक्ष आणि महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी प्रास्ताविकात सांगितले की, व्यक्तिमत्त्व विकासात नाट्यकलेला महत्त्व आहे. नाट्यक्षेत्रात तुमचा चांगल्यापैकी सहभाग असेल किंवा तुम्ही पारंगत असाल तर काय व्यक्त करावे, कशा प्रकारे व्यक्त करावे, किती व्यक्त करावे हे तुम्हाला चांगल्या प्रकारे मांडता येते. हे ज्ञान आपल्याला जीवनामध्ये पदोपदी उपयोगी येते. ते पुढे म्हणाले की, नाट्यक्षेत्रात पनवेलचे नाव मोठे व्हावे येथील तरुणांचा, नागरिकांचा सहभाग असावा म्हणून 2005मध्ये मल्हार करंडक नाट्य महोत्सवाला लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरवात केली. त्या वेळी पनवेलमध्ये नाट्यगृह नव्हते. त्यामुळे आम्हाला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत होते. प्रशांतदादा नगराध्यक्ष असताना 2011मध्ये नाट्यगृहाच्या कामाला सुरुवात झाली. 2014पासून आपण अटल करंडक राज्यस्तरीय स्पर्धेद्वारे पुन्हा एकदा सुरुवात केली. यंदा या स्पर्धेचे नववे वर्ष आहे. या वेळी अभिमानास्पद अशी स्पर्धा होताना पहायला मिळते. या स्पर्धेच्या आयोजनात श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर महाविद्यालय यांचा मोलाचा वाटा असतो. श्यामनाथ पुंडे, अभिषेक पटवर्धन, चिन्मय समेळ, अमोल खेर, अ‍ॅड. चेतन जाधव, संजीव कुळकर्णी, स्मिता गांधी, निखिल गोरे, मयूरेश नेतकर यांचा सहयोग असतो. त्यामुळेच ही स्पर्धा आपल्याला महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात पोहचवता येते. अनेकांच्या सहकार्यामुळे ही स्पर्धा यशस्वी झाल्याचे परेश ठाकूर यांनी सांगितले.

’पुढला जन्म नटाचाच मिळावा’

पुढला जन्म मला नटाचाच मिळावा, पण तो पनवेलमध्येच मिळाला तर अधिक चांगले, कारण ज्या भूमीत प्रशांत-परेश यांच्यासारखी जोडी इथे अशा प्रकारची एक नाट्यसंस्था चालवते की, जी तरुण कलावंतांना प्रोत्साहन देते अशा भूमीत जन्म झाला तर मला याहून चांगली काही प्रगती करता येईल. म्हणून माझी ही इच्छा असल्याचे उद्गार ज्येष्ठ रंगकर्मी जयंत सावरकर यांनी गौरव रंगभूमीचा हा पुरस्कार स्वीकारताना काढले.

आम्ही लहानपणापासून बघत आलो ती कला खर्‍या अर्थाने तुम्ही सुदृढ केलीत. ती कला तुम्ही आमच्यापर्यंत सोपवलीत. आता तितक्याच सुदृढपणे तिचे संगोपन करण्याची जबाबदारी आमची आहे.

-पृथ्वीक प्रताप, सुप्रसिद्ध अभिनेता आणि अटल करंडक एकांकिका स्पर्धाचा बँ्रड अम्बेसिडर

विविध नाटकांचे प्रमोशन

अटल करंडक एकांकिका स्पर्धा राज्यभरात पोहचली आहे आणि त्या अनुषंगाने आपल्या नाटकांचे प्रमोशन करण्याची संधी प्रसिद्ध नाटककर्त्यांनी या वेळी सोडली नाही. सुप्रसिद्ध अलबत्या गलबत्या नाटकाची टीम, त्याचबरोबर सुप्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक, अभिनेता संतोष पवार यांनी ’हौस माझी पुरवा’ या त्यांच्या नाटकाचे प्रमोशन अटल करंडकात केले. त्याचबरोबर सोनी मराठी वाहिनीवरील ‘हास्यजत्रा’ फेम गौरव मोरे, रोहित माने, झी मराठी वाहिनीवरील ‘फु बाई फु’ फेम स्नेहल शिगवण तसेच कलर्स मराठी वाहिनीवरील ’स्वामी’ मालिकेतील विजया बाबर, ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतील रोनक शिंदे यांनीही या अटल करंडक एकांकिका स्पर्धेच्या महाअंतिम फेरीला सदिच्छा भेट देऊन या स्पर्धेचे कौतुक केले.

सविस्तर निकाल

राज्यस्तरीय एकांकिका ः प्रथम क्रमांक फ्लाईंग राणी (कलामंथन, ठाणे) एक लाख रुपये आणि मानाचा अटल करंडक, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, द्वितीय क्रमांक कंदील (मुळजी जेठा महाविद्यालय, जळगाव) 50 हजार रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, तृतीय क्रमांक आखाडा (एकदम कडक, मुंबई ) 25 हजार रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, चतुर्थ क्रमांक डोक्यात गेलंय (सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालय, ठाणे) 10 हजार रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, उत्तेजनार्थ अजूनही चांदरात आहे (ब्लॅक कर्टन, मुंबई) पाच हजार रुपये प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, हेड स्टडी (बॅकस्टेजवाला ग्रुप, पनवेल) पाच हजार रुपये प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह,

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक ः प्रथम क्रमांक यश पवार व ऋषिकेश मोहिते (बारम-एम. डी. कॉलेज, मुंबई) दोन हजार रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, द्वितीय क्रमांक सिद्धांत सोनवणे (कंदील-मुळजी जेठा महाविद्यालय, जळगाव) 1500 रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, तृतीय क्रमांक प्रशांत केणी (उकळी-कीर्ती कॉलेज, मुंबई) एक हजार रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, चतुर्थ क्रमांक विजय पाटील (फ्लाईंग राणी- कलामंथन, ठाणे) 500 रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, उत्तेजनार्थ प्रणय गायकवाड (आखाडा-एकदम कडक, मुंबई) प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह.

अभिनेता ः प्रथम क्रमांक देवेन कोलमकर (बारम-एम. डी. कॉलेज, मुंबई) दोन हजार रुपये प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, द्वितीय क्रमांक प्रथम तायडे (कंदील-मुळजी जेठा महाविद्यालय, जळगाव) 1500 रुपये प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, तृतीय क्रमांक हिमांशू वैद्य (हेड स्टडी- बॅकस्टेजवाला ग्रुप, पनवेल) एक हजार रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, चतुर्थ क्रमांक प्रफुल्ल आचरेकर (डोन्ट क्वीट-स्वप्नपूर्ती क्रिएशन, मुंबई) 500 रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, उत्तेजनार्थ अनिकेत मोरे (गोदा -माय नाटक कंपनी, मुंबई) प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह.

अभिनेत्री ः प्रथम क्रमांक निकिता घाग (फ्लाईंग राणी- कलामंथन, ठाणे) दोन हजार रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, द्वितीय क्रमांक मानसी नाटेकर (अजूनही चांदरात आहे-ब्लॅक कर्टन, मुंबई) 1500 रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, तृतीय विजया गुंडप (आखाडा-एकदम कडक, मुंबई) एक हजार रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, चतुर्थ क्रमांक- दिपश्री शर्मा (थँक्यू-आरडी क्रिएशन, मुंबई) 500 रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, उत्तेजनार्थ सानिका कुंभार (उकळी- कीर्ती कॉलेज, मुंबई) प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह.

संगीत ः प्रथम क्रमांक शुभम ठेकले (बारम-एम. डी. कॉलेज, मुंबई)  दोन हजार रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, द्वितीय क्रमांक अभिषेक कासार (कंदिल-मुळजी जेठा महाविद्यालय, जळगाव) 1500 रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, तृतीय क्रमांक अजूनही चांदरात आहे(ब्लॅक कर्टन, मुंबई) एक हजार रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, चतुर्थ क्रमांक- डोन्ट क्वीट (स्वप्नपूर्ती क्रिएशन, मुंबई) पाचशे रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, उत्तेजनार्थ शुभम राणे (फ्लाईंग राणी-कलामंथन, ठाणे) प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह.

प्रकाश योजना ः प्रथम क्रमांक श्याम चव्हाण (बारम-एम. डी. कॉलेज, मुंबई) दोन हजार रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, द्वितीय क्रमांक अन्नपूर्णा हाजीर हो (रंगवेद, मुंबई) 1500 रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, तृतीय क्रमांक सिद्धेश नांदलस्कर (काहीतरी अडकलंय-गुरु नानक खालसा स्वायत्त महाविद्यालय, मुंबई) एक हजार रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, चतुर्थ क्रमांक डोन्ट क्वीट (स्वप्नपूर्ती क्रिएशन, मुंबई) पाचशे रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, उत्तेजनार्थ अजूनही चांदरात आहे (ब्लॅक कर्टन, मुंबई), प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह.

सर्वोत्कृष्ट लेखक ः प्रथम क्रमांक चैतन्य सरदेशपांडे (उकळी-कीर्ती कॉलेज, मुंबई) दोन हजार रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, द्वितीय क्रमांक मोहन बनसोडे  (फ्लाईंग राणी-कलामंथन, ठाणे) 1500 रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, तृतीय क्रमांक अनिकेत खोले (डोन्ट क्वीट-स्वप्नपूर्ती क्रिएशन, मुंबई) एक हजार रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, चतुर्थ क्रमांक वैभव मावळे (कंदील-मुळजी जेठा महाविद्यालय, जळगाव) पाचशे रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, उत्तेजनार्थ हेड स्टडी (बॅकस्टेजवाला ग्रुप, पनवेल) प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह.

विशेष पारितोषिके ः सर्वोत्कृष्ट वेशभूषा (कै. किशोर जोशी यांच्या स्मरणार्थ) बारम-दोन हजार रुपये, सन्मानचिन्ह, सर्वोत्कृष्ट विनोदी एकांकिका उकळी-सात हजार रुपये, सन्मानचिन्ह, सर्वोत्कृष्ट विनोदी कलाकार बबन माने (आखाडा) दोन हजार रुपये, सन्मानचिन्ह, सर्वोत्कृष्ट बालकलाकर गायत्री सोनवणे दोन हजार रुपये, सन्मानचिन्ह.

उत्कृष्ट नेपथ्य ः प्रथम क्रमांक साहिल अद्वैत (काहीतरी अडलंय), द्वितीय क्रमांक शोधयात्रा, तृतीय क्रमांक सुमित पाटील (अन्नपूर्णा हाजीर हो), चतुर्थ क्रमांक दर्शन आबनावे व यश पवार (बारम), उत्तेजनार्थ क्रमांक प्रवास.

रायगड जिल्हा प्राथमिक फेरी ः प्रथम क्रमांक हेड्स्टडी (बॅकस्टेज वाला ग्रुप, पनवेल) 10 हजार रुपये व सन्मानचिन्ह, द्वितीय क्रमांक तुंबई (सी. के. ठाकूर स्वायत्त महाविद्यालय, पनवेल) सहा हजार रुपये व सन्मानचिन्ह, तृतीय क्रमांक लपंडाव (पिल्लेज कॉलेज, पनवेल) चार हजार रुपये व सन्मानचिन्ह.

Check Also

शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …

Leave a Reply