पनवेल : बातमीदार
पुण्याच्या आनंदी ऊर्जा संस्थेमार्फत आयोजित महिलांचे आरोग्य हे सोशल कारण ठेवून फक्त डॉक्टरांसाठी एक सौंदर्य स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेची अंतिम फेरी शनिवारी (दि. 11) पुणे येथे होणार असून यात कामोठे येथील डॉ. श्रुणाल जाधव यांची अंतिम 65मध्ये निवड करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांना अंतिम फेरी जिंकण्यासाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.
पुण्याच्या प्रेरणा बेरी काळेकर (इंडिया ब्युटीफूल 2018च्या विजेत्या) यांच्या डोक्यातील ही सौंदर्य स्पर्धा असून ती कल्पना वास्तवात आणण्यासाठी त्यांच्या जोडीला मनीषा गरूड (ज्युुरी ऑफ सकाळ ब्युटी ऑफ महाराष्ट्र), डॉ. रितू लोखंडे (हेल्थ नेशन फोर लोकमत मॅरेथॉन 2018), ज्योती माटे (नेशन ऑफ वुमन फोर महाराष्ट्र) ह्या सज्ज झाल्या आहेत. सोनल दारक याची जबाबदारी सांभाळत आहेत. मेडिक्वीन मिसेस महाराष्ट्र 2020 ही सौंदर्य स्पर्धा डॉक्टरांतर्फे डॉक्टरांसाठी आहे. यासाठी मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, कोल्हापूर, औरंगाबाद या शहरांत ऑडिशन घेण्यात आल्या. जवळपास 200हून अधिक महिला डॉक्टरांनी यात सहभाग घेतला. त्यातून 65 डॉक्टरांची निवड अंतिम फेरीत करण्यात आली. महत्त्वाची बाब म्हणजे कामोठे, पनवेल, खारघर येथून डॉ. श्रुणाल जाधव यांची निवड झाली आहे. डॉ. जाधव महिलावर्ग आणि लहान मुलांवर होमिओपॅथीने उपचार करतात. मुंबईचे ऑडिशन ठाणे येथे झाले. त्यात डॉ. जाधव यांची फायनलिस्ट
म्हणून निवड झाली.
सौंदर्य स्पर्धेमध्ये एकूण 65 डॉक्टर्स अंतिम फेरीत निवडले गेले असून त्यांचा ग्रँड फिनाले 11 जानेवारी रोजी हॉटेल ऑर्चिड पुणे येथे सायंकाळी 4 ते 10 या वेळेत होणार आहे. श्रुणाल जाधव यांचे साम टीव्हीवरील संजीवनी या कार्यक्रमात 35 भाग प्रसारित झाले आहेत. जाधव यांचे महिला आरोग्य व होमिओपॅथीचे कार्यक्रम मी मराठी व आयबीएन लोकमतवरदेखील प्रसारित झाले आहेत. डॉ. श्रुणाल जाधव यांना जिंकण्यासाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.