Breaking News

सिडकोच्या मान्सूनपूर्व कामांची चौकशी करावी

नगरसेविका कुसुम पाटील यांची मागणी; अनियमित व निकृष्ट दर्जाची कामे असल्याचा आरोप

कळंबोली : प्रतिनिधी

कोरोना महामारीचा फायदा घेत सिडको अधिकारी व ठेकेदार यांनी साटेलोटे करत मान्सूनपूर्व कामांना थुकपट्टी लावण्याचे काम केले आहे. सिडको वसाहतीतील कामे निकृष्ठ दर्जाची करण्यात आली आहेत. त्यामुळे शहरातील रस्ते पाण्याखाली जावून  रहिवासींना अनेक समस्यांना सामोरे जावे लागणार आहे. तेव्हा या निकृष्ट कामांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी नगरसेविका कुसुम गणेश पाटील यांनी केली आहे. या कामात दर्जेदारपणा कसा येईल याकडे सिडको प्रशासनाने लक्ष द्यावे, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

 खांदा कॉलनी वसाहतीमध्ये गेल्यावर्षी महानगर कंपनीची गॅस पाईपलाईन टाकण्यात आली आहे. ती पाईपलाईन टाकण्यासाठी रस्त्याची खोदाई करण्यात आली होती. तेव्हापासून या रस्त्याची दुरूस्ती करण्यात आली नव्हती. या रस्त्याची दुरूस्तीची जबाबदारी महानगर कंपनीची असताना त्यांनी काही रस्त्यांची नाममात्र डागडुगी करून नवीन पनवेल सिडको अधिकार्‍यांशी साटेलोटे करून या रस्त्याची दुरूस्ती सिडको प्रशासनाच्या मान्सूनपूर्व कामातून करण्याचे मान्य केले. ठेकेदाराची काम करण्याची जबाबदारी असताना ते काम सिडकोकडून करण्यात येत असून निकृष्ट  दर्जाचा माल वापरून मलमपट्टी लावण्यात आली आहे, असा गंभीर आरोप नगरसेविका पाटील यांनी केला आहे. मान्सूनपूर्व कामाच्या नावाखाली नाममात्र बनविलेले रस्ते खड्डेमय होवून नागरिकांना वाहतुकीसाठी मोठा त्रास सहन करावा लागणार आहे, असेही त्यांनी सांगितले. या शहरातील रस्त्याबरोबर गटारे व नाल्याच्या सफाई कामात  नियमितता नसून गटारे तुंबली आहेत. शहरात पाणी शिरून नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान होण्याची भिती नागरिकांनी व्यक्त केली आहे. फुटपाथची दुरूस्ती करण्यात न आल्याने गटारात पडून नागरिकांचा जीव जाण्याची भिती नगरसेविका कुसुम पाटील यांनी व्यक्त केली आहे. तेव्हा मान्सूनपूर्व कामे युद्ध पातळीवर करण्यात येवून त्यात दर्जेदारपणा कसा येईल याकडे सिडको प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी विनंतीही त्यांनी केली आहे. येथील नागरिकांना त्रास होईल अशी कामे सिडकोकडून केली जात असतील तर आम्ही ते सहन करणार नाही, असा इशाराही नगरसेविका कुसूम पाटील यांनी दिला आहे. दरम्यान, प्रस्तुत प्रतिनिधींनी संबधित नविन पनवेल येथील कार्यकारी अधिकारी एच. डी. नवाने यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी माहिती देण्यास नकार दिला.

Check Also

बेलपाडा येथील अनधिकृत झोपड्यांवर पनवेल महापालिकेची कारवाई

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीतील बेलपाडा गावाच्या मागे डोंगरावर अचानक अनधिकृतपणे उभ्या राहिलेल्या …

Leave a Reply