उरण : प्रतिनिधी
पागोटे-कुंडेगाव खाडीत गुरुवारी (दि. 15) सकाळी हजारो मासे मृत झाल्याचे दिसून आले. मच्छिमारांच्या उपजीविकेचे साधन असणार्या या खाडीमध्ये परिसरातील कंपन्यांचे केमिकलयुक्त पाणी सोडल्यामुळे मासे मृत्यूमुखी पडल्याचा आरोप कोळी बांधवांनी केला आहे. उरण तालुक्यात अनेक लहान-मोठ्या खाड्या आहेत. या खाड्यांमध्ये अत्यंत चवदार मासळी मिळते. अनेक मासेमार या खाड्यांमध्ये मासेमारी करून आपली उपजीविका करतात, मात्र द्रोणागिरी विभागात असणार्या पागोटे-कुंडेगाव खाडीत गुरुवारी हजारो मृत माशांचा खच पडल्याचे दिसून आला आहे. खाडीतील मासे मृत्यूमुखी पडल्यामुळे मासेमारीवर उपजीविका करणार्या मच्छीमारांचे अतोनात नुकसान झाल्याने शासकीय यंत्रणांनी केमिकलचे पाणी सोडणार्या कंपन्यांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी कोळी बांधवांनी केली आहे.
पागोटे खाडीत मासे मृत अवस्थेत पडल्याचा प्रकार गंभीर असून सद्यस्थितीची पहाणी करून दोषी कंपनीवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
-सचिन अडकर, प्रदूषण नियंत्रण मंडळ अधिकारी, उरण