Breaking News

नवी मुंबईत दीड टन प्लास्टिकचा साठा जप्त

नवी मुंबई : बातमीदार

प्लास्टिकमुक्त नवी मुंबईचे ध्येय नजरेसमोर ठेवून नवी मुंबई महानगरपालिकेच्या सर्वच विभागांमध्ये प्लास्टिक प्रतिबंधात्मक मोहिमांना गती प्राप्त झालेली दिसत असून किरकोळ प्लास्टिक विक्रेत्यांप्रमाणेच प्रतिबंधात्मक प्लास्टिकच्या साठ्यांवर धडक कारवाई केली जात आहे. अशाच प्रकारची धडाकेबाज कारवाई तुर्भे एपीएमसी मार्केटमधील दोन दुकानांवर करीत त्या ठिकाणाहून 4 ते 5 ट्रक भरेल इतक्या मोठ्या प्रमाणात साधारणत: 1.5 टन प्लास्टिक पिशव्या व प्रतिबंधात्मक प्लास्टिकचा साठा जप्त करण्यात आला. ही कारवाई घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उप आयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे यांच्या नियंत्रणाखाली तुर्भे विभागाचे सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी सुखदेव येडवे आणि विभागातील अधिकारी, कर्मचारी यांच्या माध्यमातून राबविण्यात आली. जप्त केलेला प्लास्टिकचा साठा महापालिकेच्या तुर्भे येथील घनकचरा प्रकल्पस्थळी नेण्यात येऊन त्याच्यावर शास्त्रोक्त प्रक्रिया करण्यात येत आहे. याचप्रमाणे सेंट्रल फॅसिलिटी बिल्डिंग, फ्रुट मार्केट, सेक्टर 19, तुर्भे येथील हाय ग्रीप पॅकेजिंग तसेच बाबा साई पॅकेजिंग या व्यावसायिकांकडेही प्रतिबंधात्मक प्लास्टिक आढळल्याने पहिल्यांदाच गुन्हा असल्याने त्यांच्याकडून प्रत्येकी 5000 रुपये प्रमाणे एकूण 10000 रुपये इतकी दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आली.

नागरिकांना आवाहन

नवी मुंबई महापालिकेच्या वतीने महापालिका आयुक्तांच्या निर्देशानुसार प्लास्टिक प्रतिबंधात्मक कारवाया तीव्रतेने राबविण्यात येत असून नागरिकांनीही प्लास्टिक पिशव्यांचा वापर पूर्णपणे थांबवून कापडी पिशव्यांचा वापर करावा व प्लास्टिकला आपल्या दैनंदिन वापरातून हद्दपार करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply