पाली-खोपोली मार्गावर वृक्षतोडीमुळे सावली हरपली
पाली : प्रतिनिधी
पाली-खोपोली महामार्ग हा वाहतुकीच्या व प्रवाशांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे. खोपोली-वाकण महामार्ग हा मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेला जोडणारा एक महत्वाचा दुवा असल्याने या महामार्गावर रहदारी करणा-या वाहनांची संख्या मोठी आहे, मात्र या मार्गाची स्थिती पाहता गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी अशी म्हणायची वेळ आली आहे. या मार्गाव दुतर्फा असलेली झाडे तोडल्याने सावली हरपल्याचे दिसत आहे. ती सावली पुन्हा मिळणार का, असा सवाल करण्यात येत आहे.
नियोजित स्थळी पोहोचण्यासाठी सुखकर मार्ग असल्याने प्रत्येकजण या मार्गाचा वापर करत आसतात. या महामार्गावर औद्योगिक क्षेत्र, पर्यटन स्थळे असल्यामुळे या मार्गावरून सतत वर्दळ असते. या महामार्गाच्या दुतर्फा अनेक वर्ष तग धरून राहिलेली लहान-मोठे झाडे ब-याच प्रमाणात होती. ती झाडे चौपदरीकरणाच्या कामामुळे पुर्णपणे तोडण्यात आली. शेतकरी तसेच पुणे-मुंबई-ठाणे येथून पर्यटनासाठी येणार्या प्रवाशांना क्षणभर विश्रांती साठी वृक्षवल्ली उपयुक्त ठरत होती. पाली-खोपोली महामार्गाच्या रुंदीकरणाच्या वेळी अनेक झाडांची कत्तल करण्यात आली, त्यामुळे या मार्गावरील सावली पूर्णपणे नष्ट झाली आहे. नेहमी प्रवास करणारे प्रवाशी म्हाणत असतात गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी ज्या झाडांच्या सावलीत आम्ही क्षणभर विश्रांती घेऊन पुढच्या प्रवासाला जात होतो ती झाडे आता नाहीशी झाली आहेत. शासनाच्या परिपत्रकानुसार जर एक झाड तोडले तर त्या ठिकाणी चार झाडे लावायचे असा नियम आहे. पाली खोपोली महामार्गावर काम पूर्ण होत आले आहे. या महामार्गाच्या रुंदीकरणासाठी हजारो झाडे तोडण्यात आली. परंतु काम आता शेवटच्या टप्प्यात आहे. अद्यापही चार पटीने सोडा, एकही झाड लावण्यात आलेले नाही. सद्यस्थितीत तापमानाचा पारा चढला आहे. उष्णतेचा कहर अनुभवण्याची वेळ सर्वांवर आली आहे. त्यातच पाली-खोपोली मार्गावरून प्रवास करताना तीव्र झळांनी अंगाला चटके बसत आहेत. म्हणूनच येथे वृक्ष लागवड केल्यास या मार्गावर वृक्षवल्ली बहरेल, पर्यावरणात होणारा बदल थांबेल असे प्रवासीवर्गातून बोलले जात आहे.
या जूनमध्येच वृक्ष लागवड करण्यास सुरुवात करणार होतो. राज्य महामार्गाचे काम बाकी असल्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवड केली नाही, मात्र आता रस्त्याचे काम बहुतांश पूर्ण झाल्यामुळे शासनाच्या नियमानुसार त्या ठिकाणी वृक्ष लागवड केली जाणार आहे.
-सचिन निफाडे, उपअभियंता, एमएसआरडीसी