Breaking News

रायगडात सुगंधी, आकर्षक जांभळी मंजिरीचा बहर

निसर्गाचा अद्भूत आविष्कार पाहण्यासाठी निसर्गप्रेमींची रेलचेल
पाली : प्रतिनिधी
पाली सुधागडसह रायगड़ जिल्ह्यातील बहुसंख्य शेतांमध्ये जांभळी मंजिरीची सुगंधी व आकर्षक फुले बहरली आहेत. जिल्ह्यात जांभळ्या मंजिरीचे क्षेत्र वाढले असल्याचे निरीक्षण निसर्ग अभ्यासकांनी नोंदविले आहे. निसर्गाचा हा अद्भूत आविष्कार पाहण्यासाठी अनेक अभ्यासक व निसर्ग प्रेमींची रेलचेल पहायला मिळत आहे.
जांभळी मंजिरी ही पान वनस्पती असून हिचे शास्त्रीय नाव (पोगोस्टेमॉन डेक्क्नेनसिस ) असे आहे. सुप्रसिद्ध कास पठारावर ही मुबलक प्रमाणात आढळते परंतु फुलोरा मात्र सप्टेबर ते ऑक्टोबर या महिन्यात येतो. तर कोकणसह रायगड जिल्ह्यात आढळणारी जांभळी मंजिरी भात कापणी झाल्यावर रुजून येते व फुलोरा मात्र नोंव्हेबर व डिसेंबर महिन्यात येतो. हा बदल अधिवास वेगळा असल्याने होतो. जिल्ह्यात सुद्धा सड्यावर होणारी मंजिरी लवकर फुलते. असे जिल्ह्यातील प्रसिद्ध निसर्ग अभ्यासक प्रवीण कवळे यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. संपूर्ण शेत किंवा शेताचा काही भागावर फुललेली ही मनमोहक फुले पाहून जणु काही जांभळ्या रंगाची झालरच पांघरली आहे असे वाटते. आजूबाजूच्या परिसरातही मंजिरीचा सुवास दरवळत असतो. परिणामी ही मनमोहक व आकर्षक फुले अनेकांचे लक्ष वेधून घेतात. येथून जाणारे अनेक प्रवासी व वाटसरू मंजिरीची ही जांभळी झालर पाहण्यासाठी आवर्जून थांबतात. काहीजण तर येथे नियमित देखील येतात. जांभळ्या मंजिरीचा हा अद्भुत नजारा काही दिवसच पहायला मिळतो फेब्रुवारीनंतर हवामानात बदल होऊ लागला की ही फुले व झुडपे सुकून जातात. आणि पुढील वर्षी पावसाळा सरल्यावर व हिवाळा सुरू झाल्यानंतर पुन्हा एकदा जांभळी मंजिरी बहरते. बुटकी आणि झुडुपवजा असलेल्या या झाडांची पाने हिरव्या रंगाची असतात. यांना आकर्षक रंगाची जांभळी फुले तुर्‍यांप्रमाणे येतात. सकाळी धुक्याचे दवबिंदू या फुलांवर पडल्यावर ते अधिकच आकर्षक व खुलून दिसतात. जांभळ्या मंजिरीची झाडे सुगंधी द्रव्याने युक्त असतात. त्यामुळे यापासून वेगवेगळी सुगंधी तेल काढली जातात. तसेच सुगंधी द्रव्य बनविण्यासाठी देखील वापरले जाते.

जिल्ह्यात मंजिरीचे क्षेत्र वाढतेय
जिल्ह्यात जांभळी मंजिरीचे प्रमाण जास्त जाणवू लागले आहे. त्यांची दोन तीन कारणे आहेत. पहिले म्हणजे ती पूर्वीपासून आहेच, पण कास पठार प्रसिद्ध झाल्यापासून अनेकजण तिला आवर्जून बघायला लागले. तसेच दुसरे कारण म्हणजे जिल्ह्यात शेती करण्याच्या पद्धती बदलत चालल्या आहेत पूर्वी बहुतांश शेतकरी भात पीक घेतल्यानंतर दुबार पीक म्हणून वाल. हरभरा. चवळी किवा मुग वगैरे सारखी पिके घ्यायचे त्यासाठी पुन्हा नांगरट करावी लागायची त्यामुळे बर्‍याच प्रमाणात मंजिरी नष्ट व्हायची. मात्र अलीकडे पडीक शेतीचे प्रमाण सुद्धा वाढत आहे. त्यामुळे मंजिरीचे क्षेत्र वाढत आहे. असे निसर्ग अभ्यासक प्रवीण कवळे यांनी सांगितले.

हा निसर्गाचा एक मनमोहक आविष्कार आहे. ठराविक कालावधीतच आणि विशिष्ट शेतांमध्येच जांभळी मंजिरी फुललेली दिसते. पर्यावरणाच्या साखळीमध्ये तिचेही काही योगदान आहे. जांभळ्या मंजिरीच्या प्रजातीचे संरक्षण होणे आवश्यक आहे. या हंगामात हमखास ही फुले पाहण्यासाठी या ठिकाणी येतो. शाळकरी मुलांनी देखील अशा ठिकाणी भेट देणे आवश्यक आहे.
– राम मुंढे, निसर्ग अभ्यासक शिक्षक, पाटणूस-विळे

Check Also

पनवेलमध्ये एसआयआर कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा आढावा

पनवेल ः रामप्रहर वृत्तभारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या मतदार याद्यांचा विशेष …

Leave a Reply